Monsoon: सावधान! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पावसाचे अलर्ट; पुढील आठवड्यापासून धो-धो सरी कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रत पुढील आठवड्यापासून (Maharashtra) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रतील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. शनिवारी (17 मे) राज्यातील अनेक भागासह मुंबई आणि उपनगरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून काही ठिकाणी विज पडून जीवितहानी झाल्याच्याही घटना घडल्या आहे. अशातच आता पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.
दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा (Weather) जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे. यात विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचे सांगितलं जातंय. तर तिकडे विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
रविवारी मुंबईसह ठाणे पालघर भागात सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. वाचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी मुंबईत सकाळपासून पावसाने हजेरी लावली. वांद्रे, अंधेरी बोरिवली, खार, गोरेगाव परिसरात सकाळपासून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, रविवारी मुंबईसह ठाणे पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात विजाच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता
दरम्यान, नागपूरच्या प्रादेशिक मौसम विभागाने 17 मे पासून 19 मे दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात देखील 19 मे पर्यत काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह वीज आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दरम्यान, अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळवा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. सदर स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असा आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाने केलेय.
हे ही वाचा























