Kunal Patil : '400 प्लस जागा जिंकणार नाही हे महायुतीला कळून चुकलंय', कुणाल पाटलांचा घणाघात
Lok Sabha Election Results 2024 : धर्माच्या नावावर मत मागितल्याने विकास होणार नाही. 400 प्लस जागा जिंकणार नाही हे महायुतीला आता कळून चुकलंय, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.
धुळे : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपकडून (BJP) 400 पारचा नारा देण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीकडून (India Alliance) भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. धर्माच्या नावावर मत मागितल्याने विकास होणार नाही. 400 प्लस जागा जिंकणार नाही हे महायुतीला (Mahayuti) आता कळून चुकलंय, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार कुणाल पाटील म्हणाले की, आज दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, आम्हाला ठाम विश्वास आहे की, उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चांगले प्रदर्शन होईल. लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले आहे. तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आली आहे मात्र या सोबतच जनता देखील आमच्या सोबत राहिली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात आठ पैकी 7 जागांवर आम्ही निश्चित विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
धर्माच्या नावावर मत मागितल्याने विकास होणार नाही
ते पुढे म्हणाले की, 2014 आणि 2019 ला ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केले होते. ती अपेक्षा लोकांची पूर्ण झालेली नाही, जातीच्या किंवा धर्माच्या नावावर मते मागितल्याने आपला विकास होणार नाही हे तरुणांना कळून चुकले आहे. लोकसभेच्या निकालानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल निश्चित वाढेल.
400 प्लस जागा जिंकणार नाही हे महायुतीला कळून चुकलंय
महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकल्यानंतर आमचा सगळ्यांचा उत्साह आणखी वाढणार आहे. 400 प्लस जागा आपण जिंकणार नाही हे महायुतीला आता कळून चुकले आहे. इंडिया आघाडी देशात 270 ते 295 जागा जिंकेल, असेही यावेळी कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून धुळे शहरातील शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी केंद्रावर कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडले जात आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत यासाठी काही विविध कक्ष देखील स्थापन करण्यात आले आहेत. आता धुळ्यातून महायुतीचे डॉ. सुभाष भामरे की महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव बाजी मारणार? याचे चित्र येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा