Vishnudas Bhutada : मराठवाड्यात सर्वात मोठा तेल उद्योग उभा करणारे प्रसिद्ध किर्ती ग्रुपचे जनक विष्णुदास भुतडा
Vishnudas Bhutada : सोयाबीनला बाजारभाव मिळाल्यावरच तो बाजारात विक्रीसाठी घेऊन या हे शेतकऱ्यांना सांगणारे भाऊसाहेब सर्वर्थाने वेगळे व्यक्तीमत्व. सोयाबीनचे देशपातळीवर दर निश्चित करणाऱ्या भाऊसाहेब व कीर्ति ब्राण्डचा अनेक कारणामुळे सोयाबीन ऑईल उद्योगावर एक दबदबा राहिला आहे.
Vishnudas Bhutada : प्रसिद्ध किर्ती ग्रुपचे जनक विष्णुदास भुतडा (Vishnudas Bhutada) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी काल सायंकाळी निधन झाले. सर्वत्र ते भाऊसाहेब म्हणून ते परिचित होते. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भाउसाहेब यांनी अनेक नवीन संकल्पना राबविल्या होत्या. मराठवाड्यातील लातूर येथून व्यवसाय सुरू करून चार राज्यात विस्तार करणे हे ऐऱ्यागबाळयाचे काम नाही. पण भाऊसाहेबांच्या व्यावसायिक कौशल्याचा वकूबच न्यारा होता.
सोयाबीनला बाजारभाव मिळाल्यावरच तो बाजारात विक्रीसाठी घेऊन या हे शेतकऱ्यांना सांगणारे भाऊसाहेब सर्वर्थाने वेगळे व्यक्तीमत्व. सोयाबीनचे देशपातळीवर दर निश्चित करणाऱ्या भाऊसाहेब व कीर्ति ब्राण्डचा अनेक कारणामुळे सोयाबीन ऑईल उद्योगावर एक दबदबा राहिला आहे. अशा व्यक्तीमत्वाचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
'कीर्ती गोल्ड' ब्राण्डचे जनक म्हणजे विष्णुदास भुतडा उर्फ भाऊसाहेब. लातूरच्या उद्योग जगतातील हे एक हुकमी नाव. बँकेत लिपिक पदावरून त्यांचा प्रवास सुरू झाला तो देशपातळीवरील यशस्वी उद्योजकापर्यंत जाऊन विस्तारला. त्यांच्या यशस्वी नियोजनामुळे आज चार राज्यात कीर्ती ग्रुपचा व्यवसाय विस्तारला आहे.
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील विजापूर येथे ऑईल मिल आहेत. सोयाबीन ऑईल मिल क्षेत्रात देशपातळीवर कीर्ती ग्रुपचा नावलौकिक आहे तो भाऊसाहेबांमुळेच.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसारख्या पिकात पैसा आहे याची नुसती जाणीवच नव्हे तर प्रत्यक्षात पैसा मिळवून देण्यात ही त्यांचा मोलाचा वाटा आहे. बँकेतील लिपिक ते लातूरच्या बाजारपेठेत येणारे किमान 50 टक्के सोयाबीन खरेदी करण्याची तयारी, विस्तारलेला व्यवसाय... लातूर जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारे उद्योजक... हा सगळा प्रवास जिद्द, सचोटी आणि चोख व्यवहारी व्यक्तीचा आहे.
बालपण आणि प्राथमिक शिक्षण
विष्णुदास रामगोपाल भुतडा यांचा जन्म 1930 साली जन्म झाला. रामगोपाल यांचे मूळ गाव निलंगा तालुक्यातील हालकी. विष्णुदास यांचे वय पाच वर्षे असताना त्यांच्यावर आघात झाला. प्लेगच्या साथीत अचानक वडिलांचा मृत्यू झाला. पाचवी पर्यंत शिक्षण आजोळीच झालं. पुढील शिक्षणासाठी त्यांनी चुलत्याकडे लातूरला धाव घेतली.
चुलते नारायणदास हे एका व्यापाऱ्याकडे मुनीम म्हणून सेवेत होते. त्यांच्याकडे राहून विष्णुदास यांनी शिक्षण सुरू केले. इथे त्यांचे शालेय शिक्षण आणि व्यापारी शिक्षण सुरू झाले. चुलत्याच्या किराणा दुकानाची किल्ली त्यांच्याकडेच असायची. लहानपणापासूनची व्यापारी वृत्ती गप्प बसू देत नसल्याने त्यांनी मिरची विकली.
लिपिक ते मॅनेजर
मॅट्रिकमध्ये त्यांना इंग्रजी विषयात यश मिळवता आले नाही. मात्र, गणितात ते खूप पुढे होते. चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होताच ते उमरगा तालुक्याला सहकार खात्यात सुपरवायझर म्हणून रुजू झाले. याच दरम्यान मॅट्रिक उत्तीर्ण होत त्यांनी उस्मानाबाद डीसीसी बँकेत क्लार्क कम् अकाउंटंट म्हणून रुजू झाले. तिथून जिल्हा मार्केटिंगमध्ये बढतीवर अकाउंटंट म्हणून प्रवेश केला. याच दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या वतीने रिजनल को-ऑप. ट्रेनिंग सेंटरमध्ये निवडक कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग ठेवण्यात आले. इंदौरला सहा महिने राहून या ट्रेनिंगमध्ये उत्तम गुणाने उत्तीर्ण होऊन विष्णुदास यांनी आपल्या गुणवत्तेची प्रचिती दिली. तिकडून येताच उस्मानाबाद जिल्हा मार्केटिंगचे मॅनेजर म्हणून काम सुरू केले.
गणेश ऑईल मिलच्या माध्यमातून व्यवसायाचा श्रीगणेशा
लहान वयात व्यवसाय कसा करायचा हे विचार पक्के असल्यामुळे त्यांचे मन नोकरीत रमेना. त्यामुळे त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सात भागीदार जमा केले. प्रत्येकी अडीच हजार रूपये गोळा करत गणेश ऑईल मिल नावाने पहिल्या मिलचा श्रीगणेशा केला. दोन वर्षात भागीदार विखुरले. परंतु, राचप्पा हत्ते या भागीदारास बरोबर घेत ऑईल मिल चालू केली. शेंगा फोडून देण्याचे कामही सुरू केले.
उद्योगाला सुरुवात
1969 साली लातूर येथे त्यांनी पहिली ऑईल मिल सुरू केली. महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला होता. अवघे 24 हजार रुपयांच्या अर्थसहाय्य त्यानं मिळालं होते. कीर्ती उद्योग समूहाची कमल ऑईल मिल ही पहिली शाखा होती.
भागीदारीत विविध व्यवसाय
भाऊसाहेबांनी अनेक व्यवसाय केले. यात काही मित्रांना सोबत घेत भागीदारीत व्यवसाय केले. मित्र माणिकराव सोनवणे, रामचंद्र पल्लोड, बद्रीशेठ यांच्या बरोबर खत दुकान, कीर्तीकुमार, भारतलाल आडत दुकान, विष्णू इंजिनिअरिंग. देशमानेंसोबत कीर्ती किराणा साखर व वनस्पती तेलाचे होलसेल व्यवसाय. कीर्ती फूड प्रॉडक्ट, गोळ्या, बिस्किट, ब्रेड, कन्फेक्शनरी उत्पादन हे व इतर काही व्यवसाय भागीदारीमध्ये केले.
व्यवसायात वृध्दी
पत्नी, चार मुले एक मुलगी असा परिवार असलेले विष्णुदास यांची पुढची पिढी व्यवसायात यायला सुरुवात झाली होती. अशोक यांनी 1977 मध्ये व्यवसायात पदार्पण केलं. 1980 मध्ये इंडस्ट्रियल इस्टेट एरियामध्ये कीर्ती ऑईल मिल चालू केली. नंतर दाल उद्योग विचारात आल्यानंतर 1987 ला कीर्ती उद्योग या नावाने दाल व तेल उद्योगाची उभारणी केली. विष्णुदास यांचे स्वप्न व दृढनिश्चयाच्या जोरावर कीर्ती ग्रुपचा पहिला सॉलवंट प्लांट व रिफायनरी 'कीर्ती दाल मिल लि.' या नावाने 1994 ला चालू झाला. नंतर 'कीर्ती सॉलवेक्स लि.' या नावाने 1998 ला तेल प्रकल्प उभारला.
उद्योगाला प्रगतीचे पंख लावण्याची त्यांची मनीषा जागी झाली. यातूनच नांदेडच्या कुसनूर या फाईव्ह स्टार एमआयडीसीत पहिला कारखाना, सोलापुरात बोरामणीजवळ, कर्नाटकात विजापूर येथे तसेच लातुरातील ऐडिशनल एमआयडीसी व हिंगोली एमआयडीसीतही कीर्ती ग्रुपच्या अद्ययावत उद्योगाची उभारणी केली. देशातील सोयाबीन, सूर्यफूल तेलबियांचे भाव भुतडा ठरवू लागले. त्यांनी भविष्यातील अंदाज घेऊन शेतकऱ्यांना माल केव्हा विकावा याचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अल्पावधीत बळीराजा जास्त भाव देणारा उद्योग म्हणून कीर्ती उद्योग ओळखला जाऊ लागला.
अडत व्यापारी, खरीददार, उद्योजक
व्यवहार कुशल व्यक्तिमत्व ही जशी त्यांची ओळख होती तशीच अनेक सामाजिक कामात ते सक्रिय सहभाग घेत असत. माणिकराव सोनवणे आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी त्यांचे विद्यार्थीदशेपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचा वावर मुक्तपणे होता.
डोक्यावर गांधी टोपी, अंगात नेहरू शर्ट व धोतर अशा साध्या पेहरावात ते ज्यावेळेस बाजारात सौद्यासाठी येत, त्यावेळेस आमच्यासारख्या तरुणांना ते नेहमी मार्गदर्शन करत असत. आडते, खरीददार, व्यापारी आणि शेतकरी या सर्वांशी त्यांचा संवाद सहज असे... व्यवहार कुशलता आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती शिकावी तर ती विष्णुदासजी यांच्याकडून असे मत अडत व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले
लातूर शहरातील नव्हे तर जिल्हाभरातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगारा उपलब्ध करून देण्याचे काम भाऊसाहेब यांनी केलं. ते शिक्षणापेक्षा बेरोजगार तरुणातील काम करण्याची वृत्ती आणि सचोटी आणि प्रामाणिकपणा लक्षात घेऊन त्यास नोकरी देत असत... कमी शिक्षण असले तरी मात्र सचोटीने काम करणाऱ्या अनेकांना त्यांनी खूप मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. व्यक्तीतील नेतृत्व गुण आणि क्षमता ओळखण्याची त्यांची कसब ही दंग करणारी होती असे मत कीर्ती ग्रुपचे कर्मचारी प्रताप पाटील यांनी व्यक्त केले.