वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, आठवलेंनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत म्हणाले...
राज्यातील अनेक प्रश्न अद्यापही संपलेले नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार करा, कार्यकर्त्यांना, लोकांना कामाला लावा. उगाच वाद करत बसू नका. मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या पक्षालाही प्रतिनिधित्व द्या, अशी विनंती वजा सूचना करायलाही रामदास आठवले विसरले नाहीत.
Latur News : "वाद करण्यात आणि मिटवण्यातही आम्ही ॲक्टिव आहोत. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली त्यात आमचा वाद मिटला," अशी मिश्किल टिप्पणी करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटे काढले. राज्यातील अनेक प्रश्न अद्यापही संपलेले नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार करा, कार्यकर्त्यांना, लोकांना कामाला लावा. उगाच वाद करत बसू नका. मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या पक्षालाही प्रतिनिधित्व द्या, अशी विनंती वजा सूचना करायलाही ते विसरले नाहीत. लातूर (Latur) येथील पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नर्म विनोदी शैलीत अनेक चिमटे काढले.
काय म्हणाले आठवले?
जाहिरातीवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला. त्यावर आठवले म्हणाले की, असे उगाच वाद करत बसू नका. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली आणि वाद मिटला खरा. मात्र आम्ही वाद करण्यात अॅक्टिव्ह आहोत तसेच वाद मिटवण्यातही अॅक्टिव्ह आहोत हे दिसून आलं आहे. महाविकास आघाडीने त्याबाबत आम्हाला सांगू नये.
काय केली विनंती?
महाराष्ट्रासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. दीड-दोन वर्षाचा काळ निवडणुकीला राहिलेला आहे. एकाच मंत्र्याकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा. महामंडळांवर नियुक्ती करण्यात याव्यात. लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत. हे करत असताना आमच्याही पक्षाला गृहित धरुन मंत्रिमंडळात समावेश करुन घ्यावा. त्यांना हीच विनंती आहे, असं आठवले म्हणाले.
काय केल्या सूचना?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी समसमान आहेत. कोण छोटा, कोण मोठा हा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे. सध्या दलित अत्याचाराच्या घटना वाढता आहेत, यासाठी काम करावे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला होता. त्यांच्यासाठी पंधराशे कोटीचा निधी मंजूर केला आहे, तो तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आपापसांत वाद करत बसू नका महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. ते मार्गी लावण्यासाठी आपण एकत्र काम करावे अशी आमची भूमिका आहे, असं आठवले यांनी नमूद केलं.
महाविकास आघाडीलाही उत्तर
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जाहिरातीवरून संघर्ष निर्माण झाला. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकाटिप्पणी होत होती. त्यावरही रामदास आठवले यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं. महाविकास आघाडीने आमच्यातील वादावर भाष्य करु नये. आम्ही वाद करण्यात अॅक्टिव्ह आहोत तसेच वाद लवकर मिटवण्यातही अॅक्टिव्ह आहोत. पहिल्या दिवशी जाहिरात आली दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली, आमचा वाद तर एका दिवसात मिटला. हा संघर्ष पेटवून महाविकास आघाडीला काही मिळणार नसल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं.