Demonitisation : 96 लाखांच्या बदल्यात दोन हजारांच्या नोटेचे एक कोटी बदलून घ्या, पोलिसांची सतर्कता आणि उस्मानाबादचा व्यापारी लुटता-लुटता वाचला
Osmanabad : दोन हजाराच्या नोटेचे एक कोटी रुपयांचे आमिष दाखवत लातूर येथे उस्मानाबादच्या व्यापाऱ्याची 96 लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आठ लोक गजाआड झाले आहेत.
मुंबई: आमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, ती रक्कम एक कोटी इतकी असून त्या बदल्यात 96 लाख रुपये द्या, या व्यवहारात चार लाखांचा फायदा आहे असं सांगत उस्मानाबादच्या व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना लातूरमध्ये घडली असून या व्यापाऱ्याकडून 96 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. यामुळे नोटा बदलून घेण्याचा मोठा व्यवहार होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यापारी अजिंक्य देवडा यांना काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीने फोन केला. आमच्याकडे लातूर येथील एका व्यक्तीस दोन हजाराच्या नोटा बदलून हव्या आहेत. तुम्ही मोठे व्यापारी आहात. दोन हजारांच्या एक कोटीच्या नोटा आम्ही तुम्हास देतो, तुम्ही आम्हाला फक्त 96 लाख रुपये द्या. या व्यवहारात तुमचा चार लाखांचा फायदा आहे. या आमिषाला बळी पडत देवडा यांनी 96 लाख रुपये गोळा केले, यात दोनशे आणि पाचशेच्या नोटा होत्या.
लातूर येथील एमआयडीसी परिसरातील एका गोदामात हा सर्व व्यवहार होणार होता. लातूर सोलापूर आणि बीड भागातील आठ जणांच्या टोळीने हे कृत्य केले होते. त्यांनी या भागात देवडा यांना बोलावून फसवण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांना या बाबत गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन गाड्या आणि 96 लाख रुपये ताब्यात घेतले.
सदर घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांना सत्य परिस्थिती लक्षात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यापारी अजिंक्य देवडा यांच्या फिर्यादीवरून लातूर सोलापूर बीड आणि उस्मानाबाद या भागातील आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन हजार रुपयाच्या नोटा देतो म्हणून फसवून लुबाडणाच्या उद्देशाने सर्व सापळा रचणारे गजाआड झाले आहेत.
या टोळीने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केली आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत. जो व्यापारी या अमिषाला बळी पडून 96 लाख रुपये घेऊन लातूरला आला होता, त्याला या सर्व प्रकरणात प्रचंड मनस्तापाला आणि पोलीस केसला समोरं जावं लागलं आहे. त्याने अवघ्या चार लाख रुपयांच्या आमिषाला बळी पडत 96 लाख रुपये गमावले असते. मात्र सुदैवाने तो वाचला.
ही बातमी वाचा :