Latur : एसटी बस चालक आणि प्रवाशामध्ये राडा, चालक दवाखान्यात दाखल; कारण ऐकाल तर कपाळावर हात माराल!
Latur ST Bus : लातूरमधील राठोडा गावात एका एसटी बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. एका किरकोळ कारणावरून प्रवाशांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली.
राठोडा, लातूर : एसटी बस (ST Bus) वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्टे पैसे आणि इतर कारणांवरून वाद, कडाक्याची भांडणे आणि काही वेळेस हाणामारी होते. मात्र, लातूलमधील राठोडा गावात एका छोट्याशा कारणांवरून एसटी बस चालक आणि प्रवाशांमध्ये राडा झाला. चालकाला प्रवाशांनी इतकी मारहाण केली की त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
लातूर- निलंगा या बसच्या चालकास राठोडा येथे जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालक एन. पी. कवठेकर हे जबर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यातील दोषी व्यक्तींविरोधात निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अन् वादाची ठिणगी पडली
आज लातूर निलंगा ही बस राठोडा या गावात आली. एसटी बस किती वेळात निघणार आहे यावरून चालक आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. राठोडा या गावातील त्या प्रवाशांनी इतर लोकांना बोलावून घेतले. वाद घालणाऱ्यांनी एसटी बस चालकास बेदम मारहाण केली. ही सर्व घटना बसमधील प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली होती. गोंधळ वाढल्याने गावातील अनेक लोक या ठिकाणी जमा झाले होते. अतिशय किरकोळ वाद बेदम मारहाणीत रूपांतरित झाला होता. या मारहाणीत निलंगा डेपोचे चालक एन. पी. कवठेकर यांना जबर दुखापत झाली आहे.
मारहाणीच्या या घटनेची माहिती एसटी महामंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कळल्यानंतर तात्काळ सूत्रे हलली. चालक एन. पी. कवठेकर यांना लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. एसटी महामंडळातील अधिकारी हे निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसटी महामंडळातील आमच्या चालकांची प्रकृतीची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि दोषीं विरोधात रीतसर तक्रार देण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक लातूर अश्वजीत जानराव यांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
एसटी बस चालक-वाहकांचे आणि प्रवाशांचे वाद
एसटी बस चालक-वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होणे ही नवीन बाब नाही. मात्र, या वादाचे पर्यावसन हाणामारीत होणे ही चिंताजनक बाब समजली जात आहे. एसटी बस चालकाला गावातील लोकांनी मारहाण केल्याने हे प्रकरण गंभीर मानले जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.