Ambadas Danve : गद्दारी करणाऱ्यांना इतिहास माफही करत नाही आणि लक्षातही ठेवत नाही, अंबादास दानवेंचा गुलाबराव पाटलांवर निशाणा
Ambadas Danve : गद्दारी करणाऱ्यांना इतिहास माफ करत नसल्याचे वक्तव्य करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.
Ambadas Danve : गद्दारी करणारा मराठा होऊ शकत नाही. गद्दारी करणाऱ्या मराठ्यांची इतिहास नोंद घेत नाही. त्यांना इतिहास माफ करत नाही आणि लक्षातही ठेवत नाही, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका केली. शिवगर्जना अभियानाची सुरुवात करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे अंबादास दानवे आले होते. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. ज्यांनी निष्ठा ठेवली त्याच लोकांची नावे इतिहासात असल्याचे दानवे म्हणाले.
मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. एकनाथ शिंदेसारखा (Eknath Shinde) चेहरा शिवसेनतून बाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गद्दारी करणाऱ्यांना इतिहास माफही करत नाही आणि लक्षातही ठेवत नसल्याचे दानवे म्हणाले. मराठा ही जात नाही ती निष्ठेची वृत्ती आहे असंही दानवे म्हणाले. ज्या ज्या मराठ्यांनी गद्दारी केली त्यांचे नाव इतिहासात कधीच नाही. ज्यांनी निष्ठा ठेवली त्यांचेच नाव इतिहासात असल्याचे दानवे म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चोरणारांना त्यांची जागा दाखवा असे आवाहनही दानवे यांनी केलं.
Minister Gulabrao Patil : नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
आम्ही गद्दारी केली अशी आमच्यावर टीका होते. मात्र, गद्दारी का केली याची कबुली मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली आहे. मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेसारखा (Eknath Shinde) चेहरा शिवसेनतून बाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेसाठी मी त्याग केल्याचे गुलबाराव पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोललो होतो की, एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलवले पाहिजे. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आणि मराठा चेहरऱ्याच्या मागे उभे राहिल्याचे पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या बाजुला बसतो यावरच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादान दावनेंनी जोरदार टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: