Latur Crime: धक्कादायक! कुटुंबीयांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचाच केला गेम; लातूर जिल्ह्यातील घटना
Latur Crime News: पोलिसांनी हत्या करणाऱ्या भावासह त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत.
Latur Crime News: कुटुंबीयांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावाने मित्राच्या मदतीने डोक्यात गोळी झाडून हत्या (Murder) केल्याची घटना लातूरमधील (Latur) भातखेडा गावात समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी हत्या करणाऱ्या भावासह त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. सोबतच आरोपीकडून पिस्तुल, मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. तर आरोपींनी हत्या केल्याची कबुली देखील दिली आहे. सूरज गोविंद मुळे (वय 25 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचा नाव आहे. तर धीरज गोविंद मुळे असे आरोपी भावाचं नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, लातूरच्या भातखेडा येथील सूरज मुळे हा आई, बहीण आणि भावाला दारू पिऊन नेहमी छळत होता. त्याच्या या सततच्या छळाला कंटाळून त्याचा भाऊ धीरज हा आई आणि बहिणीला घेऊन पुण्याला निघून गेला होता. दरम्यान पुण्यात त्याने सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. परंतु दारुडा भाऊ सतत आपल्याला छळत असल्याचा राग त्याच्या मनात कायम होता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना छळ करणाऱ्या भावाला कायमचं संपवण्याचा त्याने निर्णय केला. यासाठी त्याने गावठी बनावटीचे पिस्टल खरेदी केले.
हत्या करून पुन्हा रात्रीतून पुण्याला परतला...
भावाचा गेम करायचा असल्याने धीरजने आपला मित्र अमर अशोक गायकवाड (वय 22 वर्षे) याची मदत घेतली. त्यामुळे त्याने भातखेडा येथील घरात राहत असलेल्या आपल्या भावावर पाळत ठेवण्याची, रेकी करण्याची जबाबदारी सोपावली होती. दरम्यान अमरने दिलेल्या माहितीनंतर धीरज सोमवारी (06 फेब्रुवारी) रात्री पुण्यातून लातुरात आला. तसेच मित्र अमर गायकवाडच्या सोबत त्याच्या मोटारसायकलवरून भातखेडा येथे पोहचला. सुरज घरात झोपलेला असतानाच धीरजने त्याच्या डोक्यात गोळी झाडली. ज्यात सूरजचा जागीच मृत्यू झाला. भावाची हत्या केल्यावर धीरज पुन्हा त्याच रात्री पुण्याला निघून गेला. तर गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल त्याने पुण्यातील एका मित्राच्या घरात त्याला न सांगता लपवून ठेवले होती.
अन् पोलिसांनी आरोपी भावाला ठोकल्या बेड्या...
दरम्यान सुरजच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी तपास सुरु केला असता, त्यांना धीरजवर संशय आला होता. त्यामुळे घटना घडली त्यादिवशी धीरज नेमका कुठे होता याचा तपास पोलिसांनी केला. यावेळी स्वत:चे लग्न जमविण्यासाठी गावाकडे जायचे आहे, असे सांगत त्याने रजा घेतली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन, पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Latur News: लातूरात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू