Navratri 2022 Renuka Devi : रेणापूरच्या रेणुकामातेचा घटस्थापना सोहळा उत्साहात संपन्न; नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
Navratri 2022 : रेणापूर येथील रेणुकामाता हे केवळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे नव्हे तर उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटक येथील भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
Navratri 2022 Renuka Devi : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी देवीची घटस्थापना केली जातेय. लातूर जिल्ह्यातील रेणापूरची रेणुकामाता देवीची देखील घटस्थापना आज अत्यंत भक्तिभावाने करण्यात आली. गेली दोन वर्ष कोरोनामुळे केवळ विधिवत पूजा करण्यात येत होती मात्र, यावर्षी भाविकांमधील उत्साह पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
रेणापूर येथील रेणुकामाता हे केवळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे नव्हे तर उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटक येथील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी भाविकांची रेलचेल, ढोल- तश्याचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून देवीची घटस्थापना होत असते. आज घटस्थापना झाल्यानंतर रेणुकामातेच्या मंदिरात प्रत्येक ठिकाणी देवीचे मानकरी, भाविक हजर होते. मंदिर समितीने मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसून आले.
आज घटस्थापना झाल्यानंतर पुढचे 10 दिवस देवीच्या उत्सवाची प्रचंड लगबग सुरु होणार आहे. या दरम्यान सर्व विधी वेळेत पार पडावेत यासाठी मंदिर समितीने कटाक्षाने प्रयत्न सुरु केले आहेत.
देवीचे दर्शन आणि हलती दीपमाळ भाविकांचे मुख्य आकर्षण
रेणुकामाता येथील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दगड आणि विटांनी उभारलेली दीपमाळ. ही दीपमाळ मुळापासून हलते. भाविक या ठिकाणी दाखल होताच आपली मनोकामना व्यक्त करतात आणि या दीपमाळेला हलवितात. त्यामुळे देवीकडे घातलेलं साकडे पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
काय आहे आख्यायिका?
माहूरगडच्या देवीचे ठाण आहे म्हणजे रेणापूर येथील रेणुका मंदिर. जगद्मनी ऋषी आणि रेणुका देवी यांचं आश्रम याच ठिकाणी होतं. एका भक्ताच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर इथूनच पुढे ते माहूरगडला प्रस्थान करते झाले. देवीची आजची जी मूर्ती आहे ती एका विहिरीत सापडली. याच ठिकाणी खोदकाम करून मंदिर बांधण्यात आलं. ज्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली त्याच्या खाली मारुतीची मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीवरच देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. हे मंदिर अनेक वर्षापासून या ठिकाणी बसलेले आहे..
अहिल्यादेवी होळकर यांनी केला जीर्णद्धार
रेणुकादेवीच्या मंदिराबाबत या मंदिराचे महत्त्व संपूर्ण भारतभर प्रचलित आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचा जिर्णोद्धार केल्यामुळे मंदिराला आजचे सुरेख स्वरूप आले आहे. वेळोवेळी गावकऱ्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला असून आता राज्य सरकारनेही मंदिराच्या विकासासाठी निधीची तरतूद केली आहे.
महत्वाच्या बातम्या :