Latur Pune Intercity Express : लातूर ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू, प्रवास आता स्वस्त आणि कमी वेळेत होणार; असं आहे वेळापत्रक
Latur Pune Intercity Express : लातूर ते पुणे या इंटरसिटी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या गाडीमुळे लातूरकरांना प्रवास अधिक कमी वेळेत होणार आहे.
Latur Pune Intercity Express : लातूर आणि पुणे या दोन शहरांना जोडणारी इंटरसिटी एक्सप्रेस (Latur Pune Intercity Express ) ट्रेन मंगळवारपासून सुरु झाली. या रेल्वेचे लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत करण्यात आलं. लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे, इतर मान्यवर आणि सर्वसामान्य लातूरकर यावेळी हजर होते. या इंटरसिटी एक्सप्रेसमुळे लातूर ते पुणे हा प्रवास अधिक स्वस्त आणि कमी वेळेत होणार असल्याने लातूरकरांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
लातूर, उदगीर, आंबेजोगाई या भागातील नागरिकांना मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वेकडे पाहिले जाते. मुंबई-लातूर ही ट्रेन बिदरपर्यंत वाढवल्याच्या कारणामुळे या गाडीला नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. या गाडीला एक पर्याय म्हणून या इंटरसिटी ट्रेनकडे पाहिलं जात आहे. ही ट्रेन लातूर रेल्वे स्टेशन ऐवजी हरंगुळ रेल्वे स्टेशन पर्यंत येणार आहे. हरंगुळ रेल्वे स्टेशन एमआयडीसी भागातच आहे. लातूर-बार्शी रस्त्यावरील हरंगुळ रेल्वे स्टेशन शहराच्या जवळ असल्याने प्रवाशांची यामुळे सोयच होणार आहे.
Latur Pune Intercity Express Time Table : पुणे-लातूर इंटरसिटी रेल्वेची वेळापत्रक
दररोज पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 6.10 वाजता ही ट्रेन सुटेल. लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्टेशनवर दुपारी 12.30 वाजता येईल.
दररोज दुपारी 3 वाजता लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्टेशन वरून ही ट्रेन पुण्याकडे मार्गस्थ होईल. पुणे येथे रात्री 9 वाजता ती ट्रेन पोहोचेल.
पुणे भागात लातूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, चाकरमानी आणि वैद्यकीय विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक लोकांचा राबता सातत्याने असतो. या सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाचे माध्यम ही इंटरसिटी ट्रेन ठरणार आहे. मुंबईवरून पुण्यापर्यंत ट्रेन आल्यानंतर पुण्यावरून लातूरला येणाऱ्या ट्रेनची संख्या वाढल्याने प्रवाशांना ते सोयीचं होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही पुण्याकडे जाण्यासाठी एक स्वस्त आणि कमी कालावधीत प्रवास पूर्ण करणारा पर्याय तयार झाला आहे.
हरंगुळ रेल्वे स्टेशनवर पहिल्या गाडीचं जंगी स्वागत
आज पहिल्यांदाच हरंगुळ रेल्वे स्टेशनवर पुण्यावरून मार्गस्थ झालेली इंटरसिटी आली होती. यावेळी लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे आणि भाजपाचे अनेक पदाधिकारी हजर होते. प्रवाशांचे आणि लातूरच्या खासदारांचं क्रेनच्या सहाय्याने हार घालत स्वागत करण्यात आले. ट्रेनच्या इंजिनसमोर श्रीफळ वाढवत आणि पुष्पहार अर्पण करत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
लातूरकरांची पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनची मागणी सातत्याने होती. ही मागणी आम्ही रेल्वेमंत्र्यापर्यंत पोहोचवली. त्यांनीही तात्काळ याबाबत पुढाकार घेत या ट्रेनचा प्रस्ताव मंजूर करून दिला. लातूरचा खासदार म्हणून संपूर्ण लातूरकरांकडून मी रेल्वेमंत्र्याचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे यांनी दिली.
ही बातमी वाचा