Latur : रस्त्यात चिखल आणि काटेकुटे, अंत्यसंस्काराला जात असताना ग्रामपंचायतीविरोधात घोषणा, संतप्त नागरिकांकडून निषेध
Latur : अंत्यसंस्काराला जात असताना लोकांनी लातूरमधील एका ग्रामपंचायतीचा घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे.
Latur : अंत्यसंस्काराला जाताना देवाचं नाव घेतलं जातं. मृत आत्म्याला शांती मिळावी म्हणून मौन पाळलं जातं. मात्र मौजे वाढवणा खुर्द येथील मृताच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीच्या नावानं निषेधाचे नारे देत अंत्यसंस्काराचा मार्ग पूर्ण केला. मागील अनेक वर्षापासून समशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात यावा ही मागणी होती. मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं.
त्रस्त आणि संतप्त झालेल्या लोकांकडून मृतदेह नेताना ग्रामपंचायतीचा निषेध
मागील दोन ते तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे समशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड चिखल आहे. त्यातच काटेरी झुडपाने चिखलातून चालणे जीवावर बेतत आहे. गावातील व्यक्तीचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या लोकांना आणि मृताच्या नातेवाईकांना अनंत अडचणीला सामोरे जावं लागलं. यामुळे त्रस्त आणि संतप्त झालेल्या लोकांनी मृतदेह नेताना ग्रामपंचायतीचा निषेध केला आहे.
सहा ते साडेसहा हजार लोकसंख्येचे मौजे वाढवणा खुर्द हे गाव आहे. या गावातील 45 वर्षीय व्यक्ती कोंडा गोटमुकले यांचं आजारपणात निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ आणि नातेवाईक एकत्र आले होते. अंत्यसंस्काराला जाताना येणाऱ्या अनंत अडचणी पाहून दुःखी असलेले नातेवाईक आणखीन चिडले. यामुळे ग्रामपंचायतीचा निषेध करत त्यांनी समशानभूमीची वाट पार केली. सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
अंत्यसंस्काराला जाताना ग्रामपंचायतीचा निषेध घोषणा
रस्त्यात चिखल आणि काटेकुटे असल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी केला ग्रामपंचायतचा निषेध केला. या निषेधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. काही लोकांनी या व्हिडीओवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही लोकांनी या व्हिडीओवर नकारात्मकपणे भाष्य केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या