(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur JCB Video : लातूरमध्ये बेधुंद जेसीबी चालकाचा थरार; 10 ते 12 जणांना उडवले, भाजीपाला आणायला गेलेला तरूण जागीच ठार
Latur JCB Viral Video : जेसीबी चालकाने दहा ते बारा जणांना उडवलं असून त्यापैकी भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
लातूर : शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते 12 जणांना उडवलं. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. नंतर नागरिकांनी त्या जेसीबी चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली दिलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लातूर शहरातील कन्हरी चौकात एका जेसीबी चालकाने मद्य प्राशन करून, बेधुंद अवस्थेत दहा ते बारा जणांना उडवलं. यामध्ये जालंदन मुळे नावाच्या युवकाचा मृत्यू झाला. जालंदर मुळे हा युवक भाजीपाला आणण्यासाठी गेला असता जेसीबी चालकाने त्याला उडवलं.
भांडण झाले आणि दारू प्यायला
सोमवारी रात्री या जेसीबी चालकाचे त्याच्या मित्रासोबत भांडण झाल्याची माहिती आहे. भांडण झाल्यानतंर त्या चालकाने दारू प्यायली आणि जेसीबी भरधाव वेगाने चालवत कन्हेरी चौकात गेला. हा जेसीबी अतिशय वेगाने जात होता. त्यामुळे रस्त्यावरील 10 ते 12 जण जखमी झाले. यापैकी जालंदर मुळे नावाचा युवक भाजीपाला आणण्यासाठी गेला होता. त्याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. तर या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.