Latur : काहीतरी आगतिक होतंय लक्षात आलं अन् सिलेंडरला मिठी मारली, फुगेवाल्याने स्वतःचा जीव दिला पण 12 मुलांना वाचवलं
Latur Accident : फुगे विक्रेत्याने समयसूचकता दाखवले आणि 12 मुलांचा जीव वाचवला. पण या घटनेत त्यांचा जीव गेला. गावातल्या लोकांनी वर्गणी काढून त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले.

लातूर: फुग्यात हवा भरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा स्फोट (Latur Cylinder Blast) होऊन एक व्यक्ती ठार तर इतर 12 लहान मुले जखमी झाली होती. या घटनेतील धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील फुगे विक्रेता रामा इंगळे यांच्या समयसूचकतेमुळे 12 मुलांचे प्राण वाचवले. मात्र या घटनेत फुगे विक्रेता रामा इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी एबीपी माझाशी साधलेल्या संवादातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामा इंगळे हा व्यक्ती सातत्याने या भागामध्ये गॅसचे फुगे विकण्यासाठी आपल्या एमएटी गाडीवरून येत असे. नित्याप्रमाणे रविवारीही ते आले होते. फुगे विक्री सुरू केल्यानंतर अरुंद गल्लीमध्ये त्याच्या गाडीभोवती दहा ते बारा मुलं जमली होती.
रामा इंगळे यांना काहीतरी अनुचित होतं याची जाणीव झाली होती. त्यामुळे गाडीवरील गॅसच्या टाकीला त्यांनी गच्च धरून मुलांना तिथून जाण्याच्या सूचना केल्या. अल्पावधीतच टाकीचा जोरदार स्फोट झाला. टाकीला कटाळून उभे असणाऱ्या रामा इंगळेमुळे टाकीचा उभा स्फोट (Latur Cylinder Blast) झाला. यामुळे लहान मुलांना कमी प्रमाणात इजा झाली. टाकीचा आडवा स्फोट झाला असता तर त्यात अनेक लहान मुलाच्या जीवावर बेतले असते.
रामा इंगळे यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे तिथे आलेल्या बारा मुलांचे प्राण वाचले आहेत. टाकीला धरून उभा असल्या कारणामुळे रामा इंगळे यांना जबर इजा झाली होती. या घटनेत रामा इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात ही धक्कादायक घटना घडली होती.
वाघोली राडी या आंबेजोगाई तालुक्यातील गावातून रामा इंगळे हे आजूबाजूच्या गावामध्ये आणि शहरांमध्ये फुगे विक्रीसाठी जात असत. रविवारी रामा इंगळे लातूरमध्ये फुगे विक्रीसाठी गेले होते. आज गावातील लोकांनी वर्गणी गोळा करत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
रविवारी झालेल्या स्फोटामध्ये पाच ते बारा वयोगटातील 12 मुलांना इजा झाली आहे. यात तीन मुलांना गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनानं या मुलांना योग्य उपचार देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंत्रणा निर्माण केली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
