Latur Earthquake : तीन दिवसांत चार भूकंपाचे धक्के, लातूरच्या हासोरी परिसरात नागरिक भयभीत; अधिकाऱ्यांना गावकऱ्यांचा घेराव
Latur Earthquake : विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच भागात दोन महिन्यात नऊ धक्के जाणवले होते. आता पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
लातूर : मागील काही दिवसांत लातूर (Latur) जिल्ह्यातील हासोरीसह उस्तुरी भागात भूकंपाचे (Earthquake ) सौम्य धक्के जाणवत आहे. मागील तीन दिवसांत चार धक्के जाणवल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बुधवारी (4 ऑक्टोबर) रोजी रात्री आठ वाजून 57 मिनिटांनी पुन्हा भूकंपाचे धक्के (Earthquake Shock) जाणवले आहे. तर, भूकंप मापन केंद्रावर 1.6 रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून एक धक्का जाणवल्याची माहिती देण्यात आली असून, गावकऱ्यांनी मात्र दोन धक्के अनुभवले असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच भागात दोन महिन्यात नऊ धक्के जाणवले होते.
गेल्या वर्षभरापासून हासोरी आणि उस्तुरी या भागामध्ये सातत्याने जमिनीखालून गूढ आवाज येत असून, हादरे बसत आहेत. बरेच दिवस प्रशासनाने जमिनीमध्ये होणाऱ्या बदलामुळे हे आवाज येत आहेत असं सांगितलं होतं. मात्र आता हे भूकंपाचे धक्के असल्याचे मान्य करण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच काळात नऊ धक्के जाणवले होते. यावर्षी 2 ऑक्टोबरला तीन धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजून 49 मिनिटाला एक आणि आठ वाजून 57 मिनिटाला एक असे दोन धक्के जाणवले. परंतु, प्रशासनाकडून एकच धक्का जाणवल्याचे सांगितले आहे. गूढ आवाजासह जमीन हदरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून नागरीक घराबाहेर येऊन थांबले होते.
नागरिकांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव...
मागील वर्षी हासोरी भागात दोन महिन्यात नऊ धक्के जाणवले होते. बरोबर एक वर्षानंतर याच काळामध्ये दोन ऑक्टोबरला एकाच दिवसात तीन भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आता पुन्हा 4 ऑक्टोबरला रात्री भूकंपाचा 1.6 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला आहे. प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती गावकरी आणि सरपंच देत आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या जीवितासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. यामुळे, हासुरी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. बुधवारी रात्री नऊच्या सुमाराला जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याची माहिती प्रशासनाला कळताच तलाठी बबन राठोड, नायब तहसीलदार अनिल धुमाळ यांनी गावात येत माहिती घेतली. मात्र, गावात आलेल्या या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी घेराव घालून जब विचारला.
गेल्यावर्षी जाणवले होते 9 धक्के...
हासोरी भागात बुधवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कारण गेल्यावर्षी 16 सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात परिसरात एकूण नऊ धक्के बसले होते. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. सलग दोन महिने गावातील लोकांमध्ये या घटनेची भीती पाहायला मिळाली होती. पण आता पुन्हा एकदा याच भागात 4 धक्के बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: