Diwali 2022 : फटाका विक्रीवर पावसाचं पाणी, यंदा बाजारात शुकशुकाट, दरांमध्ये 40 टक्क्यांची वाढ
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, तरीसुद्धा लातूरच्या (Latur) फटका बाजारामध्ये (Fireworks Market) मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Diwali 2022 : सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी (Diwali). हा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, तरीसुद्धा लातूरच्या (Latur) फटका बाजारामध्ये (Fireworks Market) मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. लांबलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं अद्याप शेतातच उभी आहेत. रास होऊ शकली नाही. त्यामुळं बाजारामध्ये आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम लातूरच्या फटाका बाजारावर झाला आहे.
पिकांमध्ये पाणी साचल्यानं मोठं नुकसान
यावर्षी पावसाने दिवाळी आल्यानंतर सुद्धा पाठ सोडली नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण लातूर जिल्ह्यात मुसळधार पावासाचा खूप मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं आहे. लातूर हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील 99 टक्के शेती क्षेत्रात रास अद्याप झालेली नाही. शेतामध्ये साचलेलं पाणी आणि भिजलेल्या सोयाबीनमुळं इतक्यात रास होईल अशी शक्यता नाही. लागवडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जोरदार पाऊस त्यानंतर गोगलगायीचा प्रादुर्भाव आणि सतत असणारी रोगराई. तसेच पीक काढणीच्या काळामध्ये सुरु असलेला पाऊस यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटलं आहे.
फटाका बाजारामध्ये शुकशुकाट
एकतर बाजारात पैसा खेळत नाही आणि त्यातच वाढलेल्या महागाईमुळं लातूरच्या फटाका बाजारामध्ये शुकशुकाट दिसत आहे. दरवर्षी लातूरच्या बाजारपेठेमध्ये 50 पेक्षा जास्त फटाका दुकान लावली जातात. मात्र, यावर्षी फक्त 38 दुकाने येथे दिसून येत आहेत. बाजारातला वाढलेला किरायाचा दर, फटाकाच्या दरांमध्ये झालेली मोठी वाढ, विक्रीतली घट लक्षात घेता दुकानदारांनी धाडस करावं की करु नये अशी स्थिती निर्माण झाली आहे.
फटाक्यांच्या दरात 40 टक्क्यांची वाढ
नैसर्गिक आपत्तीमुळे बाजार थंड आहे. त्यातच फटाक्याचे दर जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी वाढलेले आहेत. फटाक्यांमध्ये वापरण्यात येणारा बेरियम या पदार्थाचा वाढलेला दर. केंद्र शासनाने लावलेला अतिरिक्त 18% चा टॅक्स या सर्व कारणांमुळे फटाक्याच्या दरामध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. याचा थेट परिणाम विक्रीवर होणार आहे. लातूरच्या फटाका बाजारामध्ये दरवर्षी दिवाळीत चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होत असते. पंधरा दिवसांच्या या बाजारासाठी येथील प्रत्येक दुकानदार वर्षभर पैसा गुंतवून ठेवत असतो. त्या पैशाचे व्याज, शिल्लक राहिलेला माल, दुकानाचे भाडे, कामगारांच्या पगारी त्यातच घडलेली विक्री यामुळं आर्थिक गणित जुळवताना दुकानदारांची प्रचंड ओढाताण होत असल्याची माहिती विजयकुमार स्वामी यांनी दिली. विजयकुमार स्वामी यांच्या कुटुंबात मागील चार पिढीपासून हा व्यवसाय आहे. फटाका दुकानाची सुरुवात 1951 साली करण्यात आली होती. बऱ्याच वेळेस बाजाराला मंदीचा फटका बसला आहे. मात्र महागाईचा फटका यावेळेस जरा जास्तच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.