Ashwini Vaishnaw : मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ दिवाळीपूर्वीच होणार तर लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनला मंजुरी : रेल्वेमंत्री
Ashwini Vaishnaw : लातूर (Latur) रेल्वे स्टेशनवर पिट लाईन (Pit Line) उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Ashwini Vaishnaw : मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिवाळीपूर्वी होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली. तर लातूर (Latur) रेल्वे स्टेशनवर पिट लाईन (Pit Line) उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच पिट लाईन उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे वैष्णव म्हणाले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार सुधाकर शृंगारे (MP Sudhakar Shrangare) यांनी दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान लातूरला पिट लाईन उभारणीच्या कामाला मंजुरी देण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. नवीन रेल्वे गाड्या सुरुवात करण्यासाठी अडचण येत असल्यानं लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारावी अशी मागणी मागील अनेक वर्षापासूनची आहे. याबाबत खासदार सुधाकर शृंगारे यांनी अनेकदा रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.
दिवाळीपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते कोच फॅक्टरीचे उद्घाटन होणार
मराठवाडा रेल्वे कोच कारखाना आणि पिट लाईन संदर्भात खासदार सुधाकर शृंगारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत खासदार सुधाकर शृंगारे यांनी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्या संदर्भातील संपूर्ण माहिती अश्विनी वैष्णव यांना दिली. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित दिवाळीपूर्वी करण्यात येणार आहे, याबाबत रेल्वेमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे शृंगारे म्हणाले. तसेच लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारणीच्या मागणीला या भेटीदरम्यान अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली.
पिट लाईनचे महत्त्व
पिट लाईनला मंजुरी देण्यात आल्याने लातूर स्टेशनवरुन नवीन गाड्या सुरुवात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. पिट लाईनची सुविधा उपलब्ध झाल्यास रेल्वे गाड्यांची स्वछता करणं, कोचची देखभाल करणं, पाणी उपलब्ध करणं, किरकोळ दुरुस्ती अशा अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लातूरवरुन नवीन गाड्या सुरुवात करण्यास मदत होणार आहे. लातूरला सध्या पिट लाईन नसल्याने सोलापूर-तिरुपती, सोलापूर-कुर्ला यासारख्या गाड्या या दूरवरुन लातूरमार्गे जात आहेत. लातूर हे शैक्षणिक आणि व्यापारीदृष्ट्या मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. डाळ आणि सोयाबीनवर आधारित मोठे उद्योग लातूरमध्ये आहेत. याशिवाय सीआरपीएफ, बीएसएफचे केंद्र येथे आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळेही लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरुवात करण्याची नागरिकांची मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या: