Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचे पैसे आले लाडक्या लेकाच्या खात्यावर, आई-मुलाचा प्रामाणिकपणा; अन् पैसे दिले परत शासनाला
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत असताना धुळे तालुक्यातील नकाणे गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आला आहे.
धुळे: राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Scheme) संदर्भात विविध माहिती समोर येत असताना धुळे तालुक्यातील नकाणे गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आला आहे. नकाणे गावातील रहिवाशी असलेल्या मुलाच्या नावे असलेल्या योगित खैरनार यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेने आणि तिच्या मुलाने हे पैसे शासनाला जमा केल्याचा हा प्रकार समोर आला आहे.
आधार कार्डमुळे झाली गल्लत
धुळे तालुक्यातील नकाणे गावातील रहिवाशी असणाऱ्या भिकुबाई प्रकाश खेरणार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज केला. मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडताना भिकुबाई यांचे आधार कार्ड ऐवजी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड जोडले गेले होते. यामुळे काही दिवसातच त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या खात्यावर तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांच्या मुलाने हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत पडताळणी केली असता, आपले आधार कार्ड त्याला जोडले गेल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला.
प्रामाणिकपणाचे प्रशासनाकडून कौतुक
याबाबत खैरनार कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पैसे परत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेत त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून एका चलनाद्वारे खैरनार कुटुंबाला आलेले पैसे शासनाला जमा केले. खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज भरला जात असताना मुलाचे आधार कार्ड दिले गेल्यानंतर त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले. मात्र हे पैसे आपल्याला नको असे त्यांनी मला सांगितल्यानंतर आपण देखील हे पैसे परत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर माझे आधार कार्ड जोडून लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरल्यानंतर आता माझ्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशी प्रतिक्रिया भिकुबाई खैरनार यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केल्यानंतर आता त्याची शासनाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आली. मात्र अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शासनाचे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा भिकुबाई खैरनार यांनी दाखवला. मात्र भिकुबाई खैरनार या अपात्र झाल्याने त्यांचे पैसे काढून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र या वृत्तामागील वास्तव दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न.
हे ही वाचा
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार, वाजवी खर्चात कपात करण्याची सूचना