Hasan Mushrif: गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष म्हणत खासदार महाडिकांनी दहीहंडीला 'वासा'च्या दुधाला हात घालताच आता हसन मुश्रीफ काय म्हणाले?
Hasan Mushrif: गोकुळचा चेअरमन महायुतीचा आहे. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Hasan Mushrif: खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडी कार्यक्रमांमध्ये बोलताना गोकुळवरून टोलेबाजी केली होती. तसेच जिल्हा परिषद मनपा आणि गोकुळचे मैदान मारण्यासाठी साथ द्या, असा आवाहनं केलं होतं. त्याचबरोबर गोकुळमधील कळीचा मुद्दा असलेल्या वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित करतानाच हसन मुश्रीफ यांचा सुद्धा उल्लेख केला होता. आता या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफ यांनी आज महाडिक यांनी उपस्थित केल्या मुद्द्यांवर बोलताना सांगितले की खासदार धनंजय महाडिक यांचा दहीहंडी कार्यक्रम दरवर्षी असतो. आणि मी वेळाने आलो होतो. त्यामुळे त्यांचे भाषण पूर्ण झालं होतं. मात्र, गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन कसा झाला याची माहिती सगळ्यांनाच असल्याचे ते म्हणाले.
महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये
वासाच्या दुधावर बोलताना त्यांनी म्हटले की वासाच्या दुधाचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. शेतकरी वासाचे दूध परत मागतात, पण कायद्याने ते परत करता येत नाही. वासाचे दूध संघाने केले की शेतकऱ्यांसमोर आले पाहिजे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आली आहे. गोकुळचा चेअरमन महायुतीचा आहे. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये. गोकुळचे निवडणूक आता सभासदांच्या हाती गेली आहे. गोकुळच्या कारभार शंभर टक्के नाही पण 90 टक्के कारभार सुधारला असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
शिंदे मुख्यमंत्री असताना या संदर्भात तक्रार
दरम्यान, गोकुळ याचिका संदर्भात बोलताना असं मुश्रीफ म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी टेस्ट ऑडिट देखील झालं आहे. ज्यांनी याचिका केली आहे, त्यांना याची माहिती नसावी. ज्यावेळी कोर्टाची नोटीस येईल त्यावेळी त्यांचे निराकरण केले जाईल असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, गोकुळच्या संचालकाच्या उधळपट्टीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. गोकुळचे संचालक हे स्वतःच्या पैशाने गोव्याच्या सहलीला गेले होते. स्वतःच्या पैशाने संचालक जर जात असेल तर त्यामध्ये हरकत घ्यायचं कारण काय अशी विचारणा त्यांनी केली. घड्याळ आणि ब्लॅंकेट खरेदी देखील चर्चा झाली. जी काही खरेदी केली आहे ती योग्य पद्धतीने केली असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
























