Deepak Kesarkar on Karnataka : आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना बंदी करू शकतो, पण तसे करणार नाही, सामोपचाराने प्रश्न मिटावेत; दीपक केसरकरांचा बोम्मईंना टोला
तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला.
Deepak Kesarkar on Karnataka : तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला. महाराष्ट्रात आमचे सरकार असल्याने आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो, पण तसे आम्ही करणार नाही. त्यांनी अविचाराने निर्णय घेतला, तर तसाच आपणही घेणं हे योग्य नाही, सामोपचाराने प्रश्न सुटले पाहिजेत, अशी आमची इच्छा असल्याचे केसरकर म्हणाले.
पालकमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर यांनी कर्नाटक मुद्यावरून तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केले. केसरकर म्हणाले, कोणत्याही धरणाचे पाणी सोडलं, की प्रश्न सुटतात असे नाही. पाणी योजनेसाठी 2 हजार कोटी आम्ही दिले आहेत. कर्नाटककडून सीमा भागातील नागरिकांना कशाप्रकारे वागणूक दिले जाते हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कर्नाटक त्यांच्या लोकांना बहुभाषा सुविधा देखील देऊ शकले नाहीत. न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल हा आमचा विश्वास आहे. तुमच्याकडे रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? अशा शब्दात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना केसरकरांनी टोला लगावला.
केसरकर यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हानाची भाषा केली जाते, पण तुम्ही गुन्हा केला म्हणून तुम्ही तुरुंगामध्ये होता. मात्र, सीमावादासाठी शिंदेंनी आंदोलन केलं म्हणून ते कर्नाटक मधील जेलमध्ये 45 दिवस होते.
आमदारांना जेवणाचा डबा येत होता
यावेळी राज ठाकरे यांच्यावर केसरकर यांनी अधिक बोलणे टाळले. ते म्हणाले, राज ठाकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलणं मला योग्य नाही. पैशाने माणसं फुटत असती आणि विकत घेता येत असती, तर सर्व उद्योगपती नेते बनले असते. एकनाथ शिंदे यांच्या मागे लोक का गेली? याचा सर्वांनी विचार करायला हवा. अधिवेशन काळात शिंदेंच्या घराकडून सर्व आमदारांना जेवणाचा डबा येत होता.
उद्धव ठाकरे बळी पडले
केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही आमदारांना कधी प्रेम देऊ शकला नाही भेटू शकला नाही. तुम्हाला हिंदुत्व सुद्धा मान्य नव्हतं तुम्हाला सावरकरांचा झालेला अपमान मान्य होता. मात्र, बाळासाहेब असते तर त्यांना हे सर्व मान्य झालं नसतं. म्हणून आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाले. मागे राहिलेल्या लोकांनाही हे सत्य लवकरच समजेल. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे कटकारस्थान होते, त्याला उद्धव ठाकरे बळी पडले. आम्ही जनतेशी वाफादर म्हणून तुम्ही काहीही बोलला, तरी आम्हाला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या