Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात; जिल्हाधिकारी, एसपींसह प्रमुख अधिकारी गडावर
Vishalgad Encroachment : अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रमुख अधिकारी गडावर पोहोचले आहेत. विशाळगडावर अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.
कोल्हापूर : किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामध्ये विशाळगडावर आणि पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड नासधूस करण्यात आली. ज्यांचा अतिक्रमणाशी संबंध नाही अशा लोकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाले. यानंतर आता आज जिल्हा प्रशासनाला जाग आली असून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रमुख अधिकारी गडावर पोहोचले आहेत. विशाळगडावर अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.
गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. विशाळगडावर काल रवींद्र पडवळ आणि संभाजीराजेंकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. यावेळी गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. यावेळी वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली.
संभाजीराजेंचा प्रशासनावर आरोप
दरम्यान, शिवभक्तांना कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, विशाळगडमध्ये पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असं आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी शिवभक्तांवर केलेल्या कारवाईबाबत पोलिसांसोबत चर्चा केली. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत तुमच्या तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, विशाळगड मुक्ती साठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे ! एक ऐतिहासिक कार्य तुम्ही करत आहात.. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.. ही काळजी आम्ही घेऊ !
इतर महत्वाच्या बातम्या