Vishalgad Encroachment : विशाळगडावर स्थानिकांना मारहाण, दगडफेक झाल्याचा आरोप; पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप
Vishalgad Encroachment : विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे.
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटावसाठी आज खासदार संभाजी राजे छत्रपती विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. दगडफेकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
गुन्हा दाखल झाल्यास अभिमान
संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी गडाकडे जाऊ नका, असे आवाहन केलं आहे. संभाजीराजे यांनी विशाल गडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज (14 जुलै) सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेत विशाळगडाकडे प्रस्थान केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. दरम्यान, आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्यास मला अभिमानच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच, असे राजे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला संकटात आहे, आज विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच, असे म्हटले आहे.
पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई
किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचा आवाहन केलं होतं. तसेच संभाजीराजे यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. मात्र, संभाजी राजे यांनी चर्चेस नकार दिला आहे.
संभाजी राजे आंदोलन का करत आहेत? हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल
दुसरीकडे संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संभाजी राजे हे आंदोलन का करत आहेत, हे अनाकलनीय असल्याचे म्हटलं आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळगडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत. अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या