(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Royal Horse Show : कोल्हापुरात आजपासून पोलो मैदानावर 'द राॅयल हाॅर्स शो'चा थरार; अश्वप्रेमींसाठी मोठी पर्वणी
कोल्हापुरात (Kolhapur News) आजपासून (10 मार्च) तीन दिवस जातीवंत घोडे आणि घोडेस्वारांची कला पाहण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूरातील पोलो मैदानावर 'द रॉयल हॉर्स शो' आजपासून सुरू होत आहे.
The Royal Horse Show : कोल्हापुरात (Kolhapur News) आजपासून (10 मार्च) तीन दिवस जातीवंत घोडे आणि घोडेस्वारांची कला पाहण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूरातील पोलो मैदानावर 'द रॉयल हॉर्स शो' आजपासून सुरु होत आहे. त्यामध्ये 250 घोडेस्वार सहभागी होत असल्याची माहिती कोल्हापूर इक्वेस्टरियन असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. 'द रॉयल हॉर्स शो' स्पर्धेत 20 थरोब्रेड, 40 काठेवाड, 20 मारवाडी असे एकूण 80 घोडे तसेच 250 घोडेस्वार सहभागी होणार आहेत. चीफ पेट्रन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा होत आहे, कोल्हापूरातील ही स्पर्धा म्हणजे अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे असल्याचे युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले. आजपासून 13 मार्चपर्यंत हा शो असणार आहे.
80 घोडे व 250 घोडेस्वार सहभागी होणार
मालोजीराजे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, "पुणे, ठाणे, सातारा, अकलूज, कोल्हापूर, पन्हाळा, अतिग्रेसह अन्य घोडेस्वार शोसाठी दाखल होत आहेत. स्पर्धेसाठी 20 थरोब्रेड, 40 काठेवाड, 20 मारवाडी असे एकूण 80 घोडे व 250 घोडेस्वार सहभागी होणार आहेत. तसेच श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूल, जापलूप इक्वेस्टरियन सेंटर, आर्यनस वर्ल्ड स्कूल, द ग्रीनफिंगर्ज स्कूल (अकलूज), संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, वरदा रायडिंग क्लब, दक्षिण व्हॅली इक्वस्टरियन सेंटरमधील घोडेस्वारांचा समावेश आहे."
घोडेस्वार पुन्हा तयार व्हावेत
मालोजीराजे पुढे म्हणाले की, "सर्वसामान्य लोकांना हा शो पाहता यावा तसेच आजच्या पिढीला घोडेस्वारीचे प्रशिक्षण मिळावे, या हेतूने शोचे आयोजन केले आहे. आज शहरात सात ते आठ शाळांत घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले जाते. कोल्हापूर संस्थानात पांडुरंग खाडे आणि श्यामराव चव्हाण यांच्यासारखे नामांकित घोडेस्वार होऊन गेले. त्यांच्यासारखे घोडेस्वार पुन्हा तयार व्हावेत, हीच आमची इच्छा आहे." दरम्यान, विशाल बिशनोई (अहमदाबाद) व हृदय छेडा (जर्मनी) स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करणार आहेत. स्पर्धेनिमित्त विविध क्रीडा प्रकारांत ठसा उमटविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या