Kolhapur : एनआयएने सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि सहा तासाने सोडले, पण कारण नसताना कुटुंबाची मानसिक नासधूस झाली त्याचे काय?
देशभरातील आयसिस माॅड्यूलचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देशभरात धाडसत्र सुरु आहे. काल देशभरात सहा राज्यांमधील 13 जिल्ह्यांमध्ये काल धाड टाकली. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश होता.
Kolhapur : देशभरातील आयसिस माॅड्यूलचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देशभरात धाडसत्र सुरु आहे. काल देशभरात सहा राज्यांमधील 13 जिल्ह्यांमध्ये काल धाड टाकली. यामध्ये राज्यातील नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शौकत शेख यांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीसाठी एनआयए पथक पहाटेच घरी येऊन झाडाझडती करत होती. सहा तासांच्या चौकशीनंतर केवळ नावामध्ये साधर्म्य असल्याचा साक्षात्कार एनआयए पथकाला झाला आणि त्यांना सोडून देण्यात आले.
मात्र, एनआयएसारख्या तपाससंस्थेच्या निष्काळजीपणामुळे त्या कुटुंबाची पत मात्र पंचक्रोशीत धुळीस मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर जमावाने त्यांचे लब्बैक कार्यालयाची सुद्धा तोडफोड करून टाकली. त्यामुळे शेख कुटुंबाला मुळापासून हादरा बसला आहे.
एनआयएचा गैरसमज आणि कुटुबांची मानसिक नासधूस
घरातील व्यक्तींना आहे त्याच ठिकाणी थांबवून एनआयएकडून धाडसत्र सुरु ठेवले. सख्ख्या भावांची तब्बल 6 तास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेलाच आपला गैरसमज झाल्याचे लक्षात आले. इर्शाद शेखकडून लब्बैक इमदाद फौंडेशन संस्था चालवली जाते. मात्र, तपास यंत्रणेला हवी असणारी आणि ही संस्था वेगळीच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर तपास यंत्रणेची नजर होती, अशी माहिती समोर आली आहे.
शेख कुटुंबात दोघे भाऊ आणि आई वडिलांसह अंबाईनगर परिसरात राहतात. मात्र, चौकशी केल्याचे समजताच जमावाने कार्यालयाची नासधूस केली. त्यामुळे भेदरलेल्या कुटुंबाला जीवाची सुद्धा भीती वाटू लागली होती. आपली मुलं देशविघातक कृत्य करू शकत नाहीत हे सांगताना दोन भावांच्या वृद्ध वडिलांना रडू कोसळले होते.पोलिसांनी परिस्थितीचे भान राखत घराला चोख बंदोबस्त दिल्याने आणि चौकशीअंती काहीच संबंध नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुबीयांचा जीवात जीव आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या