महिला दिनीच कोल्हापूर जिल्हा मोर्चे-निर्दशनांनी गाजला; इचलकरंजीत वाढत्या महागाईविरोधात स्वामिभानी महिला आघाडीचा मोर्चा
Kolhapur : इचलकरंजीमध्ये आभाळाला टेकलेली महागाई, गॅस आणि इंधन दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी महिला आघाडी तसेच स्वाभिमानी पक्षाकडून इचलकरंजी प्रांत कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
Kolhapur News : वाढत्या महागाईविरोधात आज महिला दिनीच कोल्हापुरात महिलांनी आक्रोश करत महिलांविरोधात रोष व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इचलकरंजीमध्ये आभाळाला टेकलेली महागाई, गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी महिला आघाडी तसेच स्वाभिमानी पक्षाकडून इचलकरंजी प्रांत कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच महागाईविरोधात तिरडी मोर्चा काढण्यात आला. दुसरीकडे, गडहिंग्लजमध्येही मोर्चा काढण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. प्रांत कचेरीसमोर रस्त्यावरच चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला समन्वय समितीतर्फे ही निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून देण्यात आले.
निवेदनात, आंतरधर्मीय विवाहावर नजर ठेवू पाहणारा राज्य शासनाचा जी.आर. रद्द करा, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मिळणारे 5 किलो धान्य पूर्ववत द्या, शासकीय-निमशासकीय खात्यातील रिक्त जागा त्वरीत भरा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान त्वरीत द्या, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि वीजेची दरवाढ रद्द करा, शिक्षण, आरोग्य, रोजगार योजनावरील गुंतवणूक वाढवा, महिला विषयक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, वृद्ध, निराधार, विधवांची पेन्शन वाढवा, दिव्यांग महिलांच्या विकासासाठी आर्थिक निधी द्या, सरकारी जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करा, बेघरांच्या घरांसाठी जागा, घरबांधणीसाठी आर्थिक मदत करा आदी मागण्यांचा समावेश आहे.
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शक्तींची संख्या वाढवा
देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शक्तींची संख्या वाढवा, असे आवाहन जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केले. लोकशाहीमार्गाने निवडणुका होतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे हुकूमशाहीकडे चाललेल्या सत्ताधाऱ्यांना भय वाटले पाहिजे असे जनशक्तीचे संघटन निर्माण करायला हवे, असेही श्रीपतराव शिंदे म्हणाले. महागाई, गॅस व वीज दरवाढीच्या निषेधार्थ जनता दलातर्फे गडहिंग्लज प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. शहरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. प्रमुख मार्गावरून फिरून आल्यानंतर प्रांतकचेरीसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
इतर महत्वाच्या बातम्या