Sundar Elephant Death : कर्नाटकमध्ये सुंदर हत्तीचं निधन होऊनही न कळवल्याने भाविकांमध्ये नाराजी, आमदार विनय कोरेही भडकले!
Sundar Elephant Death : 'सुंदर' हत्तीचे कर्नाटकमध्ये निधन होऊनही कळवलं नसल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर आमदार विनय कोरे देखील चांगलेच भडकले आहेत.
Sundar Elephant Death : कोल्हापुरातील (Kolhapur) जोतिबा मंदिरात (Jotiba Temple) वास्तव्यास असलेल्या 'सुंदर' हत्तीचे (Sundar Elephant) कर्नाटकमध्ये (Karnataka) निधन होऊनही कळवलं नसल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर आमदार विनय कोरे (Vinay Kore) देखील चांगलेच भडकले आहेत. सुंदर हत्तीच्या निधनाची माहिती कळवायला उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
वारणा समूहाकडून 'सुंदर' हत्ती जोतिबा देवाला अर्पण करण्यात आला होता. परंतु 'पेटा' या संस्थेने हत्तीचा छळ होतो, त्याची साखळदंडातून मुक्तता करुन प्राणी संग्रहालयात सोडावं, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुंदर हत्तीला वारणेतून कर्नाटक इथल्या बाणेरगठ्ठा पार्कमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र या हत्तीचे बाणेरगठ्ठा पार्कमध्ये निधन झाल्याची माहिती मिळताच जोतिबाच्या भक्तांमध्ये दुःख पसरले आहे.
दख्खनचा राजा कुलदैवत जोतिबा देवाचा मानकरी असलेल्या 'सुंदर' हत्तीचा 27 ऑगस्ट रोजी मृत्यू होऊनही कोणतीच माहिती वारणा उद्योग व शिक्षण समूहाला न दिल्याने भाविकांसह वारणा खोऱ्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुंदरच्या भेटीसाठी गेलेल्या भक्तांना सुंदरच्या निधनाची वृत्त समजताच धक्का बसला. त्यांनी तात्काळ आमदार विनय कोरे यांना मोबाईलवरुन संपर्क साधून माहिती दिली. निधनाचं वृत्त समजताच त्यांना अश्रू अनावर झाले. विनय कोरे यांनी वारणा उद्योग समूहाच्या वतीने सुंदर हत्तीला श्रद्धांजली वाहिली.
वारणा समूहाकडून सुंदर हत्ती जोतिबा देवस्थानला भेट
वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने विनय कोरे यांनी जोतिबा देवस्थानला सुंदर हत्ती भेट म्हणून दिला होता. तथापि, काही वर्षांनी प्राणी मित्र संघटनेने हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार करत त्याची मुक्तता करुन प्राणीसंग्रहालयात सोडावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती.
भाविक कर्नाटकात गेल्यानंतर निधनाची माहिती समजली
सुंदरची देखभाल वारणा समूहाकडून सुरु असतानाच सर्वोच्च न्यायालय सुंदरला जंगलात सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जून 2014 मध्ये वारणेतून कर्नाटकमधील बाणेरगठ्ठा पार्कमध्ये सुंदर हत्तीला नेण्यात आले होते. कोल्हापूरमधील जोतिबा भक्त सुंदर हत्तीसाठी केळी, सफरचंद घेऊन खास भेटण्यासाठी जात असत. दोनच दिवसांपूर्वी काहीजण बाणेरगठ्ठा पार्कमध्ये गेले असता तिथल्या प्रशासनाने सुंदर हत्तीचं 27 ऑगस्ट रोजी निधन झाल्याचं सांगितले.
वारणा परिसरातून नाराजी
या भक्तांनी आमदार विनय कोरे यांना फोन करुन याची माहिती दिली. यानंतर आमदार कोरे चांगलेच भडकले. निधनाची माहिती उद्योग समूहासह जोतिबा देवस्थानला देणं आवश्यक होतं. मात्र, तशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सुंदर हा जोतिबा दैवताच्या पालखीचा मानकरी होता. त्याच्या निधनाची माहिती कळवायला उशीर का केला असा सवाल त्यांनी विचारला. तर दुसरीकडे भाविकांमध्येही प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सुंदर हत्तीच्या निधनाने भाविकांमध्ये दु:ख पसरलं आहे.