Ajit Pawar in Kolhapur : तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar in Kolhapur : थेट पाईपलाईनचे उद्घाटन न करता ते पाणी नागरिकांना कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न करतो. कोल्हापूरला जीएसटीचे पैसे कमी मिळतात याबाबत मी मार्ग काढेन, असेही ते यावेळी म्हणाले.
कोल्हापूर : कुणी सांगितलं म्हणून तालमीत गेलो नाही, मी विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतो, कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) काही कामाचा शुभारंभ करण्यासाठी आलो होतो त्यामुळे आज आल्यावर जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी कोल्हापुरातील (Kolhapur) समस्यांचा आढावा घेतला. अजित पवार (Ajit Pawar in Kolhapur) आज (29 जानेवारी) कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी आज (29 जानेवारी) सकाळी गंगावेश तालमीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले.
अजित पवार म्हणाले की, सकाळी लवकर गंगावेश तालमीला जाऊन आलो. कोल्हापूर शहरातील तीन तालमीला विशेष महत्व आहे. या तालमींच्या काही सूचना होत्या, त्यांना जी मदत करायची आहे ती केली जाईल. थेट पाईपलाईनचे उद्घाटन न करता ते पाणी नागरिकांना कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न करतो. कोल्हापूरला जीएसटीचे पैसे कमी मिळतात याबाबत मी मार्ग काढेन, असेही ते यावेळी म्हणाले.
शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक होणार
ते म्हणाले की, शाहू मिलच्या (Shahu Maharaj) जागेवर शाहू महाराजांचे स्मारक होणार आहे. मात्र, ती जागा वस्त्र उद्योग विभागाकडे आहे ती आपल्या ताब्यात घ्यावी लागेल. त्यासाठी चंद्रकांतदादा यांच्याशी बोलून ती जागा घेतली जाईल. कोल्हापूर कन्व्हेशन सेंटरला 300 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे सांगत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सेंटर होणार असल्याचे सांगितले.
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा सुंदर बनवला, पण..
सातारा इथं महाराणी ताराराणी यांच्या स्मारकाचा आराखडा द्यायला सांगितला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतील. शेंडा पार्क याठिकाणी प्रशासकीय इमारतीचा आराखडा दाखवण्यात आला आहे. रंकाळा अधिक चांगला कसा करता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत. अंबाबाई मंदिर (Ambabai Mandir) परिसर विकास आराखडा सुंदर बनवला आहे. हे पूर्ण करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. भाविकांची, वाहनांची संख्या वाढली आहे, चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे, मुख्यमंत्र्यांना हा आराखडा दाखवला जाईल आणि काम केलं जाईल. स्थानिक नागरिकांनी मदत करणं गरजेचं आहे, असेही आवाहन त्यांनी केली.
कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान 10 दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे, कोल्हापुरात या निमित्ताने 10 दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल, काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असून यासाठी 40 कोटी रुपये देण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. या गळतीमुळे 6 टीएमसी पाणी वाया जात होते, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या