(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : उद्धव ठाकरे आमचे दैवत, पण आमच्या दैवताला बाहेर काढून चुकलं; राजेश क्षीरसागर यांचा निशाणा
Maharashtra : आम्ही शिवसेनेतच आहोत, शिवसेना आमचीच असून धनुष्यबाण देखील आमचाच राहणार आहे, असा विश्वास राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापूर : "आम्ही राजकीय दिशा बदलली आहे, परंतु, आम्ही निष्ठा बदलली नाही. विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेलो आहोत. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) थोडं रागाने बोलत असतील पण भविष्यात ते समजून घेतील. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. परंतु, आमच्या दैवताला बाहेर काढून चुकलं, असा निशाणा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी साधला आहे.
राजेश क्षीरसागर यांना एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखलं जातं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा ते निवडून आले आहेत. परंतु, 2019 ला काँग्रेसकडून त्यांचा पराभव झाला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील जवळपास 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. या सर्वांसोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले.
"आम्ही शिवसेनेतच आहोत, शिवसेना आमचीच असून धनुष्यबाण देखील आमचाच राहणार आहे. दोन तृतीय अंश लोकप्रतिनिधी आमच्याकडे आहेत, त्यामुळे चिन्ह आमच्याकडेच राहील. आम्ही अद्याप शिवसेनेतच आहोत. आम्ही आमची राजकीय दिशा बदलली आहे. परंतु, निष्ठा बदलली नाही. उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. परंतु, आमच्या दैवताला बाहेर काढून चूक झाली, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, "मातोश्रीचा आदेश वेळोवेळी मानत आलो आहे. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विकासासाठी जात आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत निवडणूक लढवू शकलो असतो, पण त्यावेळी आदेश पाळला. आदेश आला की रस्त्यावर आलो, 2014 ला मला मंत्रिपद मिळणार होतं, पण तिन्ही वेळा टाळण्यात आलं. दर दहा वर्षांनंतर असं का होतं? हे उद्धव ठाकरे यांनी पाहिलं पाहिजे"
चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद घेतला
दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी यावेळी आपली मंत्री पदाची अपेक्षा देखील बोलून दाखवली. शिवाय एकेकाळी अत्यंत जहरी टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले. "मला मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली तर ती योग्य पद्धतीने पार पाडू. चंद्रकांत पाटील आणि माझं प्रेम पाहिलं नाही, फक्त वाद पाहिले आहेत. चंद्रकांत पाटील यांचा मी आशीर्वाद घेतला आहे. त्यांचा मानसन्मान ठेवेन, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या