Sharad Pawar on Kolhapur: जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहन देतोय, कोल्हापुरातील प्रकारावरुन शरद पवारांचा गंभीर आरोप
Sharad Pawar on Kolhapur : राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, पण त्यांच्याशी संलग्न लोक रस्त्यावर उतरु लागले, अहिंसेतून कटूता निर्माण झाल्यास ते बरोबर नसल्याचे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar on Kolhapur: शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur News) आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेटस लावण्यात आल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहान देतात, असा गंभीर आरोप त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना केला. दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे उदात्तीकरण होत असेल, तर खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कोल्हापुरातही जातीय तणाव निर्माण झाल्याने शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
शरद पवार म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष दंगलीसारख्या गोष्टीला प्रोत्साहित करत आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, मोबाईलवर कोणी चुकीचा मेसेज पाठवला असला, तरी त्यासाठी रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देण्याची गरज नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, पण त्यांच्याशी संलग्न लोक रस्त्यावर उतरू लागले, अहिंसेतून कटूता निर्माण झाल्यास ते बरोबर नाही. जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, त्यामागे विचारधारा आहे. अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे लहान घटकांना संरक्षण देत कोणी कायदा हातात घेत असल्यास कारवाई करणे सरकारचे काम आहे.
कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या
दुसरीकडे, काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर शहरामध्ये रॅली काढण्यावर ठाम आहेत. मात्र त्याला कोल्हापूर पोलिसांनी विरोध करत तुम्हाला या ठिकाणी जितक्या वेळ आंदोलन करायचं ते करा, असे आवान करत रॅलीला परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच संपूर्ण शहरात अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाजी चौक परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या