(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: वस्ताद आज डाव दाखवणार! 10 वर्षांनी कोल्हापूरच्या गैबी चौकात शरद पवारांची सभा, आणखी दोन बडे मासे गळाला?
Kolhapur news: समरजीत घाटगेंच्या घरी ब्रेकफास्ट, चाय पे चर्चा करताना शरद पवार कोल्हापूरची रणनीती आखणार, कागलच्या गैबी चौकात 10 वर्षांनी सभा. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटलांनी पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे नेते समरजीत घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज थोड्याच वेळापूर्वी शरद पवार समरजित घाटगे (samarjit Ghatge) यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी दाखल झालेत. आज कागलमध्ये पवारांनी (Sharad Pawar) मेळाव्याचं आयोजन केले आहे. याच मेळाव्यात समरजीत घाटगेंचा पक्षप्रवेश होईल. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजीत घाटगेंची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
गेल्या दहा वर्षापासून आमदारकीसाठी तयारी करत असलेल्या माजी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये घाटगे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे.
त्यांची थेट लढत कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होणार आहे. हसन मुश्रीफ हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, अजित पवारांनी वेगळा त्यामुळे शरद पवार आजच्या सभेत कोणता राजकीय संदेश देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान आज सकाळी शरद पवार यांच्या भेटीसाठी घाटगे कोल्हापुरात हॉटेलवर पोहोचले होते. त्या ठिकाणी सदिच्छा भेट घेतल्यानंतर शरद पवार घाटगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आता संध्याकाळी कागलच्या गैबी चौकात शरद पवारांची सभा होईल. तब्बल दहा वर्षांनी हा योग जुळून आला आहे.
शरद पवार हे पुढील चार दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यामुळे या काळात ते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची मोर्चेबांधणी करतील, असा अंदाज आहे.
के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील शरद पवारांच्या भेटीला
शरद पवार हे समरजीत घाटगे यांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी पंचशील हॉटेलवर अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काहीवेळापूर्वीच अजितदादा गटाचे के.पी. पाटील ( K P Patil) पंचशील हॉटेलवर पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ ए.वाय. पाटील (A Y Patil) हेदेखील हॉटेलमध्ये पोहोचले. हे दोन्ही नेते राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक आहेत. दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. त्यामुळे शरद पवार आणि या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे.
आणखी वाचा