
Rohit Pawar on Ajit Pawar : आताचे दादा भाजपचे, पूर्वी राज्यात प्रचार, आता बारामतीच्या सोसायटीत जायची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
10 दिवसांनंतर ते असेही म्हणतील साहेब मुख्यमंत्री, कृषीमंत्री देखील नव्हते, साहेब आमदार देखील नव्हते, जो पवार घराण्याचा काळ सुरू झाला तो अजितदादा राजकारणात आल्यापासून सुरू झाला, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर : अजितदादा कुठं आहेत आता? बारामतीमध्ये एखाद्या सोसायटीत प्रचार करत आहेत. आमच्या सोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचार सभा घ्यायचे, पण आता कुठं बसले आहेत, तर सोसायटीमध्ये प्रचार करत बसले आहेत? अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवारांवर प्रहार केला.
पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यात खूप फरक
रोहित पवार म्हणाले की, भाजपला जे पाहिजे होते ते त्यांनी केलं. अजितदादा पुरोगामी विचारासोबत, आमच्या बरोबर राहिले असते, तर कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण तसं न करता दादा सोसायटीत प्रचार करतात. पवार साहेबांच्या कार्यावरच अजितदादा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे अजितदादा यांच्या वक्तव्यावर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा असा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यात खूप फरक आहे. पूर्वीच्या दादांचे आम्ही फॅन होतो आताचे दादा भाजपचे आहेत त्यामुळे ते खोटं बोलायला लागले आहेत. 10 दिवसांनंतर ते असेही म्हणतील साहेब मुख्यमंत्री नव्हतेच, साहेब कृषीमंत्री देखील नव्हते, साहेब आमदार देखील नव्हते, जो पवार घराण्याचा काळ सुरू झाला तो अजितदादा राजकारणात आल्यापासून सुरू झाला, असेही ते म्हणाले.
मला देखील निवडणुकीनंतर जेलमध्ये टाकू शकतात
रोहित पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरूनही टीका केली. ते म्हणाले की, आमच्या उमेदवारांवर गुन्हे नाही तर त्यांना जेलमध्ये टाकतील. मला देखील निवडणुकीनंतर जेलमध्ये टाकू शकतात, ही भाजपची प्रवृत्ती आहे. जे जे शाहू महाराज यांच्याबरोबर जात आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहेत, भाजप विचित्र डोक्याचं असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेबांना मोठे मोठे गुंड भेटतात. सर्वसामान्य लोकं भेटू शकत नाहीत पण गुंड भेटतात. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गुंड वापरले जात आहेत, भाजप इतक्या लेवलला जात आहे की त्याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे नागरिकांनी या निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर द्यावं, असे आवाहन त्यांनी केले.
दादा आणि उद्योगपतींचे कधी पटलेलं नाही
रोहित पवारांनी रतन टाटांवरूनही अजित पवारांवर तोफ डागली. अजितदादांना मी खूप जवळून पाहिलं आहे त्यांच्याजवळ कॉन्ट्रॅक्टर बिल्डर असतात. दादा आणि उद्योगपतींचे कधी पटलेलं नाही, त्यामुळे रतन टाटा साहेबांच काम किती मोठं आहे हे अजितदादांना कळणार नाही, कारण त्याबाबतीत त्यांची तिथं पोहोच नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली. अजितदादा यांना रतन टाटा यांचे कार्य माहीत नसल्यामुळे आणि मोदींना खुश करण्यासाठी ते काय बोलतात यामध्ये गडबड झाली असावी. ही दादांची चूक नाही कारण स्क्रिप्ट दिल्लीवरून येते आणि दादा ती वाचतात, अजितदादा आता जे बोलतात ते स्वतःच काहीच बोलत नाहीत, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
