Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखाना एमडी मारहाण प्रकरण; डॉ. संदीप नेजदारसह 8 जण अटकेत, 25 जणांवर गुन्हा दाखल
राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मंगळवारी सायंकाळी 25 ते 30 जणांकडून गाडी अडवून बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
Rajaram Sakhar Karkhana : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांनी आमदार सतेज पाटील गटाचे समर्थक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा दिवसांची पोलिस कोठडी
डॉ. संदीप विलास नेजदार (वय 50), बबलू उर्फ प्रसन्नकुमार विश्वासराव नेजदार (वय 40), तुषार तुकाराम नेजदार (वय 32), कौस्तुभ उर्फ पुष्कराज कमलाकर नेजदार (वय 25), दीप सुनील कोंडेकर ( वय 23) श्रीप्रसाद संजय वराळे (वय30), पप्पू उर्फ प्रफुल्ल कमलाकर नेजदार (वय 23, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर) आणि प्रवीण बाबूराव चौगुले (वय 32, रा. शिये, ता. करवीर) यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. युवराज बाजीराव उलपे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, कौस्तुभ तुकाराम नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, प्रवीण बाबूराव वराळे (सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह अनोळखी 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर रस्त्यात बेदम मारहाण
राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मंगळवारी सायंकाळी 25 ते 30 जणांकडून गाडी अडवून बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जुना संघर्ष पुन्हा एकदा नव्याने उफाळून आला
कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या ताब्यात आहे. हा कारखाना आपल्या ताब्यात यावा यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जंग जंग पछाडलं होतं. मात्र, सभासदांनी सतेज पाटील यांच्या विरोधात कौल देत पुन्हा हा कारखाना अमल महाडिक यांच्या ताब्यात दिला आहे.
विरोध करणाऱ्या सभासदांचा ऊस कारखान्यामार्फत उचलला जात नाही असा आरोप करत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर उपसंचालक कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. हा मोर्चा सकाळी संपल्यानंतर पडसाद सायंकाळी कसबा बावड्यात उमटले. एमडी प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील यांचे समर्थक डॉ. संदीप नेजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रकाश चिटणीस यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार धनंजय महाडिक यांनी तत्काळ सीपीआरला भेट दिली व प्रकाश चिटणीस यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सतेज पाटील हे मनोरुग्ण आहेत, त्यांना स्वतःची बुद्धी आणि विचार नाही, सत्ता नसल्यामुळे ते विचित्र पद्धतीने वागत आहेत, जनतेने त्यांचा केलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याची खोचक टीका धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली होती.
सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात राजकीय संघर्ष आता टोकाला गेला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा नव्याने उफाळून आलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचे पडसाद उमटतील हे नक्की आहे.
इतर महत्वाच्या बातम्या