कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं.

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला (Prashant Koratkar) आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यापूर्वी न्यायालयाने(Court) कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे, आता 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे. कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी-कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती. तर, कोरटकर घरात एकटा कमावता आहे, त्याला एक मुलगी आहे अशी बाजू कोरटकरच्या वकिलांनी मांडली. दरम्यान, यावेळी, असीम सरोदे आणि वकील सौरभ घाग यांच्यात तू तू मै मै झाल्याचं दिसून आलं.
प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते.
कोर्टात पोलिसांचा युक्तिवाद
कोल्हापूर न्यायालयाने पोलिसांच्या बाजुने युक्तिवाद करण्यात आला. त्यामध्ये, पोलिसांनी तीन दिवसात आरोपी याची चौकशी केल्याची माहिती दिली, आरोपीचे आवाजाचे नमुने घेतले आहेत. त्याने ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत, त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच, कोरटकरने जी गाडी वापरली आहे, ती जप्त करण्यासाठी एक टीम नागपूरला गेल्याचेही पोलिसांनी सांगितले. कोरटकरने अजून कोणाकोणाची मदत घेतली आहे, अजून कोणते वाहन वापरले याचा तपास करायचा आहे. ज्यावेळी फोन केला त्यावेळी आरोपीसोबत कोण होते याचा तपास करण्याचा आहे. तसेच, कोरटकरला आर्थिक मदत कुणी केली याचा तपास करण्याचा आहे. त्यामुळे, अधिकची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती.
सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांचा युक्तिवाद
आरोपी कोरटकरने याप्रकरणी काही नावं घेतली आहेत. खरंच त्यांचा सहभाग आहे का याची चौकशी करण्याची आहे. असा गंभीर गुन्हा असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. धीरज चौधरी याने मदत केल्याचं त्याने सांगितलं आहे. आरोपी काही हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी, त्याने कोणतेही ऑनलाईन पैसे दिले नाहीत, त्यामुळे याला कुणी मदत केली हे पहावं लागेल. त्यासाठी, कोल्हापूर पोलिसांना आरोपची 5 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केला होता. दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य आरोपीने केलं आहे. या आरोपीला कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने मदत केली आहे, का हा तपास करावा लागणार आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू आरोपीचा होता. फोन केलेला आवाज त्याचाच होता हे सिद्ध होतंय. त्याला समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोण मदत करत आहे का, याचा तपास करावा लागणार आहे. पोलिसांच्या तपासात यश मिळत आहे, त्यामुळे पोलिसांच्या हक्कानुसार आणखी पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद पोवार यांनी न्यायालयात केला.
आणखी कारचा तपास करावा लागेल
तपासादरम्यान त्याची पोलिसांकडून कोठडी गेली तर अडचण निर्माण होईल. कारण, त्यामध्ये खोलात जाऊन तपासात करायचा आहे. जर पोलीस कोठडी मिळाली नाही तर ज्यांचा समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू होता ते यशस्वी होतील. कोरटकरने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक गाडी जप्त केली आहे. पण तो इंदोर, हैदराबाद, चंद्रपूर इथं गेला, त्यामुळे आणखी गाड्या वापरल्याची शक्यता आहे. त्याचा तपास करावा लागणार आहे, त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी ही विनंती, सूर्यकांत पोवार यांनी न्यायालयात केली होती.
आरोपीचे वकील सौरभ घाग यांचा युक्तिवाद
आरोपी प्रशांत कोरटकरला 1 मार्च रोजी अंतरिम जामीन मिळाला होता. त्यावेळी चौकशीसाठी बोलवायला हवं होतो. जातीय तेढ निर्माण केली जाते असं नेहमी सांगितलं जातं. पण तो ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप कुणी व्हायरल केली. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये मी हे संभाषण व्हायरल करतो असं म्हटलं आहे. फोन कॉल व्हायरल झाला त्याचवेळी कोरटकर यांनी नागपूरमध्ये पोलिसात तक्रार केली होती. आता पोलिसांनी चौकशी केली आहे, आवाजाचे नमुने घेतले आहेत. मग यांना पुन्हा कशासाठी पोलीस कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील सौरभ घाग यांनी केला होता. तसेच, आरोपीसाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे. अंतरिम जामीन मिळाला असताना आम्ही आवाजाचे नमुने द्यायला तयार आहोत असं आरोपीने म्हटलं होतं. कोरटकर एक पत्रकार आहेत, त्यांचं एक चॅनेल आहे, घरामध्ये ते एकटेच कमावणारे आहेत, असाही युक्तिवाद वकील सौरभ घाग यांनी केला होता.
दरम्यान, न्यायायलयाीतल सुनावणीवेळी आरोपीचे वकील सौरभ घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यात कोर्टासमोर तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला होता.
असीम सरोदेंचा युक्तिवाद
प्रशांत कोरटकरने एक आलिशान गाडी वापरली आहे, ती गाडी घेऊन तो कुठं कुठं फिरला याचा शोध घ्यायचा आहे. धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याचा शोध घायचा आहे. तसेच, व्हिडीओ ऑडिओ क्लिप पोस्ट केली हा गुन्हा आहे का? ज्या ज्या व्यक्तींची नावं कोरटकरने घेतली ते कोण आहेत. त्या व्यक्तींची क्राईम पार्श्वभूमीचे आहेत का? याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे पोलिसांना अजून कोठडी मिळाली पाहिजे, असा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केला होता.
कोरटकर एकटाच घरात कमावता - घाग
प्रशांत कोरटकर हा एकटाच घरामध्ये कमावता आहे, घरामध्ये एक मुलगी आहे, असे आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी न्यायालयात म्हटले. तसेच, यांचा (असीम सरोदेंचा) आवाज म्युट करा, असेही त्यांनी म्हटले. त्यावर, संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बंद करा, असे सरोदे यांनी म्हटले. तर, सरोदे तुम्ही मीडियासमोर बोलत नाही कोर्टात आहात लक्षात घ्या, असे सौरभ घाग म्हणाले. त्यामुळे, दोन्ही वकिलांची तू-तू मै-मै पाहायला मिळाली.
दरम्यान, चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरने कोर्टात या लोकांची घेतली नावे
प्रशिक पडवेकर
धीरज चौधरी
हिफाजत अली
राजू जो
हेही वाचा
Video: कोल्हापूर कोर्टात अखेर हाणामारी झालीच; वकिलाचाच प्रशांत कोरटकरवर हल्ला; व्हिडिओ समोर























