Kolhapur Police: कोल्हापूर : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पोलीस , वाहतूक व्यवस्थेचा स्वत: फिरून आढावा घेणार; पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ग्वाही
कोल्हापूरमधील वाहतूक व्यवस्थेबाबत स्वतः फिरून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. मावळते एसपी शैलेश बलकवडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
Kolhapur Police: सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पोलिस असतील. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वेल्फेअरच्या माध्यमातून अधिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेबाबत मी स्वतः फिरून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महेंद्र पंडित यांनी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
महेंद्र पंडित यांची कोल्हापूरमध्ये (Kolhapur Police) नियुक्ती होण्यापूर्वी बृहन्मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त होते. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय हीच कार्यशैली असेल. कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची नगरी असून, पुरोगामी शहर आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आणि बलकवडे यांच्याबरोबर गडचिरोलीत काम केलं असून त्यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम यापुढेही सुरू राहतील. त्यांनी पुढे सांगितले की, सर्वसामान्य व्यक्ती शेवटची पायरी म्हणून पोलिस ठाण्यात येत असल्याने न्याय मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी दखल पात्र गुन्हा आहे, त्याठिकाणी तो नोंद होईल. अदखलपात्र असेल तर त्याचीही नोंद घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महेंद्र पंडित मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आहेत. ते 2013 च्या यूपीएससी तुकडीतील आहेत. महेंद्र पंडित हे 2013 मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाले आहेत. ते मूळचे सिन्नरचे आहेत. नांदेड येथे त्यांनी उपअधीक्षक पदावर काम केले आहे. 2017 मध्ये त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली भागात अपर पोलिस अधीक्षक म्हणून दोन वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 2018 मध्ये पोलिस महासंचालनालयाने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईत येण्यापूर्वी ते नंदुरबारमध्ये कार्यरत होते.
मावळते पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे कोल्हापूर लयभारी असल्याची भावना निरोप घेताना व्यक्त केली. कोल्हापूर स्वयंभू असून लोक प्रेमळ आहेत, केलेल्या कामाबद्दल समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. शैलेश बलकवडे यांची बदली पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल येथे गट क्रमांक एकमध्ये समादेशक म्हणून नियुक्ती झाली आहे. बलकवडे 30 सप्टेंबर 2020 रोजी कोल्हापुरात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्याला बदली झाली.
डीवायएसपी अजित टिके यांनी पदभार स्वीकारला
दुसरीकडे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनीही पदभार स्वीकारला आहे. करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. कोल्हापूरचे डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात बदली झाली आहे. सांगलीमधील अजित टिके यांची कोल्हापूर शहर पोलिस दलात डीवायएसपीपदी बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणमधील मनमाड उपविभागाचे समीरसिंग साळवे यांची कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या