Kolhapur Rain Update: पंचगंगा नदी धोका पातळीवरून खाली आली, कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पुराची भीती कमी झाली, गगनबावडा वाहतूक पूर्ववत
जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच इतर जिल्हा व ग्रामीण असे 93 मार्ग अजून पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर वाहतूक पूर्ववत झाली आहे.

Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने महापुराची धास्ती निर्माण झाली होती. मात्र, काल (21 ऑगस्ट) दिवसभर आणि रात्री सुद्धा पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला. आज सकाळी पंचगंगा नदी धोका पातळीवर धोका पातळीवरून दोन इंचाने खाली आली आहे. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील 62 बंधारे अद्याप पाण्याखाली असून त्यामुळे थेट वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच इतर जिल्हा व ग्रामीण असे 93 मार्ग अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर वाहतूक पूर्ववत झाली असून कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर अंशत: वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्याचा पाण्याचा एसटी महामंडळाच्या सेवेला सुद्धा बसला आहे. जिल्ह्यातील 34 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दूध संकलनावर परिणाम
दरम्यान, जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा दिल्याने त्याचा परिणाम गोकुळ दूध संकलनावर झाला आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यामध्ये दूध वाहतुकीला अडचण निर्माण झाल्याने गोकुळ दूध संघाचे गेल्या तीन दिवसात 16000 लिटर तसेच इतर दूध संघाचे सुमारे 4 हजार लिटर असे 20 हजार लिटर दूध घरातच राहिलं आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याच्या आवक सुद्धा घटली आहे.
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला
दूधगंगा धरणाच्या सांडव्यावरून असणाऱ्या विसर्गामध्ये घट झाली असून सद्यस्थितीमध्ये सांडव्यावरून 9500 घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरु आहे. विद्युतनिर्मिती केंद्रातून 1500 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणामधून एकूण 11000 प्रतिसेकंद इतका विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सुरू आहे. दूधगंगा नदीकाठावरील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांना विनंती आहे की कोणत्याही कारणासाठी नदीपात्रामध्ये उतरू नये. सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज 22 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 3 फुटांवरून 1 फुटापर्यंत खाली आणून 7900 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 10 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























