(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Old Pension Scheme : समुद्रावर पाऊस पाडायचा आहे का? जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्यांना बेरोजगारांचा सवाल!
कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगार आज (17 मार्च) एकवटले. अर्ध्या पगारावर काम करायला आम्ही तयार असा नारा देत दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Kolhapur News : सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी (old pension scheme) संप पुकारल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियातही सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगार आज (17 मार्च) एकवटले. जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावर काम करायला असा नारा देत दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुशिक्षित बेरोजगार चांगलेच संतप्त झाल्याचे दिसून आले.
मोर्चात सहभागी झालेल्या एका तरुणाने सांगितले की, "आमदार खासदारांना पेन्शन मिळते म्हणून आम्हाला पेन्शन पाहिजे, अशी यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमदार खासदारांची सुद्धा पेन्शन बंद करा. यांना समुद्रावर पाऊस पाडायचा आहे का? शासकीय कर्मचाऱ्यांना लाखभर पगार असूनही म्हातारपणाचे नियोजन करता येत नसेल, तर काय उपयोग? दुसऱ्या एका तरुणाने सांगितले की, शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, 12 तास काम करुन दाम मिळत नाही. शासकीय कर्मचारी आठ तास काम करतात, पण किती काम करतात? दरम्यान, या मोर्चाविरोधात पोलिसांचा दबाव असल्याचा आरोप काही मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी केला.
दुसरीकडे, सोशल मीडियात संपाची जाहीरपणे खिल्ली उडवली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल झाली होती.
कोल्हापुरात आंदोलक महिला बांगड्या घेऊन आल्या
दुसरीकडे कोल्हापुरात काही कर्मचारी कामावर येत असताना त्यांच्यावर रोष व्यक्त करण्याचा प्रकारही घडून येत आहे. कोल्हापुरात सिंचन भवन कार्यालयात काही कर्मचारी कर्तव्यावर आले असता काही महिला कर्मचाऱ्यांकडून त्यांना बांगड्या देण्याचा प्रकार घडला. त्यामुळे भेदरलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावरुन पळ काढत जागा मिळेल त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज चौथा दिवस आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची सुद्धा हेळसांड होत असल्याने संयम सुटत चालला आहे. त्यामुळे संपावर तातडीने तोडगा निघावा अशीच भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालल्याने शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही कर्मचारी सकाळी कार्यालयात येऊन सही करुन पुन्हा आंदोलनात असाही प्रकार घडत आहे. तसेच काही कर्मचारी कारवाईच्या भीतीने कार्यालयात हजेरी लावत आहेत. मात्र, त्यांना सहकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागता आहे. काही कर्मचारी कार्यालयात हजर झाल्याचे समजताच काही शासकीय महिला कर्मचारी टाऊन हाॅलमधून थेट सिंचन भवनमध्ये बांगड्या घेऊन दाखल आल्या. त्यामुळे य कर्मचाऱ्यांची पळता भूई थोडी झाली.
इतर महत्वाच्या बातम्या