(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : कोल्हापुरात आंदोलक महिला बांगड्या घेऊन आल्या; भेदरलेल्या 'त्या' शासकीय कर्मचाऱ्यांवर 'अंडरग्राउंड' होण्याची वेळ!
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालल्याने शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही कर्मचारी सकाळी कार्यालयात येऊन सही करून पुन्हा आंदोलनात असाही प्रकार घडत आहे.
Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना वेठीस धरले असल्याने अतोनात हाल होत आहेत. दुसरीकडे कोल्हापुरात काही कर्मचारी कामावर येत असताना त्यांच्यावर रोष व्यक्त करण्याचा प्रकारही घडून येत आहे. कोल्हापुरात सिंचन भवन कार्यालयात काही कर्मचारी कर्तव्यावर आले असता काही महिला कर्मचाऱ्यांकडून त्यांना बांगड्या देण्याचा प्रकार घडला. त्यामुळे भेदरलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावरुन पळ काढत जागा मिळेल त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज चौथा दिवस आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची सुद्धा हेळसांड होत असल्याने संयम सुटत चालला आहे. त्यामुळे संपावर तातडीने तोडगा निघावा अशीच भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी कर्मचारी सही करुन आंदोलनात
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालल्याने शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही कर्मचारी सकाळी कार्यालयात येऊन सही करुन पुन्हा आंदोलनात असाही प्रकार घडत आहे. तसेच काही कर्मचारी कारवाईच्या भीतीने कार्यालयात हजेरी लावत आहेत. मात्र, त्यांना सहकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागता आहे. काही कर्मचारी कार्यालयात हजर झाल्याचे समजताच काही शासकीय महिला कर्मचारी टाऊन हाॅलमधून थेट सिंचन भवनमध्ये बांगड्या घेऊन दाखल आल्या. त्यामुळे य कर्मचाऱ्यांची पळता भूई थोडी झाली. काहींनी लपण्यासाठी स्वच्छतागृहात धाव घेतली. यावेळी महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून कार्यालयातून पळ काढला. आपल्या मागण्या मान्य करून घ्या, दबावाखाली कामावर हजर होऊ नका, असा इशारा या महिलांनी दिला.
दुसरीकडे, मेन राजाराममध्येही कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, प्रशासनाकडून आंदोलक कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. आरोग्य विभागावर कोणताही संपाचा परिणाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चा
सोशल मीडियात सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संपाची जाहीरपणे खिल्ली उडवली जात असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही.
जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत. अर्ध्या पगारावर काम करायला.. ते ही विना पेन्शन... सुशिक्षित बेरोजगारांचा युवक युवतींचा भव्य मोर्चा. जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण मोर्चात सहभागी होऊया. उद्या (17 मार्च) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी दसरा चौकात हजर राहावे, असेही आवाहन यामधून करण्यात आले आहे. मी येतोय, तुम्हीही या.. यायला लागतंय असाही उल्लेख करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या