Kolhapur News: डोळे उघडण्यापूर्वीच मिटले, पुराच्या पाण्यात वेळेत उपचार न झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य केंद्रातील ड्रायव्हर, डाॅक्टर ठरले बाळाच्या आईसाठी देवदूत
नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने दुःखाची छाया पसरली असली तरी, आईला वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणारे 108 रुग्णवाहिकेतील डॉ.स्वप्नील तमखाने आणि चालक सतीश कांबळे हे मात्र देवदूत ठरले.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नवजात बालकाला डोळे उघडण्यापूर्वीच डोळे मिटावे लागले. नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने दुःखाची छाया पसरली असली तरी, आईला वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणारे 108 रुग्णवाहिकेतील डॉ.स्वप्नील तमखाने आणि चालक सतीश कांबळे हे मात्र देवदूत ठरले. त्यामुळे नवजात बालकाच्या आईवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. हा हृदयद्रावक प्रसंग मंगळवारी (19 ऑगस्ट) घडला. बोरबेट (ता.गगनबावडा) येथील कल्पना आनंदा डुकरे (वय ३३ वर्षे) या गर्भवती महिलेवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बाळाच्या आईचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गगनबावडा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कुंभी नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ठिकठिकाणी सखल भागात आले. मंगळवारी सकाळी बोरबेट येथील गर्भवती महिला कल्पनाला प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीतून गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण पुढील उपचारासाठी तिला रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. कोल्हापूर येथील दवाखान्यात नेताना खोकुर्लेपैकी पडवळवाडी येथे वाटेतच तिची 102 रुग्णवाहिकेमध्ये प्रसुती झाली. सातव्या महिन्यातच अवेळी प्रसुती झाल्याने व बाळाची योग्य वाढ नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे तालुका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
स्ट्रेचरवरून पुराचे पाणी करून नेलं
दरम्यान, या गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी कोल्हापूरकडे नेणं गरजेचं होतं. गगनबावडा कोल्हापूर मुख्य मार्गावर खोकुर्ले येथे पाणी असल्याने तेथून त्यांना निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 108 रुग्णवाहिकेतून त्यांना कोदेमार्गे किरवेपर्यंत नेण्यात आले. किरवे-लोंघे या दरम्यान पुराचे पाणी असल्याने निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिकेचे डॉ.स्वप्नील तमखाने व चालक सतीश कांबळे यांनी नागरिकांच्या मदतीने कल्पना डुकरे यांना स्ट्रेचरवरून किरवे येथील पुराचे पाणी पार करून नेले. कळे आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. कल्पना डुकरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























