Satej Patil on Lumpy Skin Disease : लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करा अन्यथा अनुदानात वाढ करा; सतेज पाटलांची मागणी
लम्पी आजाराने दगावलेल्या (Lumpy Skin Disease) जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे, अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी सतेज पाटील यांनी अधिवेशनात विधान परिषदेत केली.
Satej Patil on Lumpy Skin Disease : लम्पी आजाराने दगावलेल्या (Lumpy Skin Disease) जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे, अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात विधान परिषदेत केली.
लम्पीबाबत विधानपरिषदेत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सध्या लम्पी आजारामुळे जनावरे दगावत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासकीय आकडेवारीनुसार 11 हजार जनावरे लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) दगावली आहेत. आकडेवारीनुसार दिवसाला सव्वा लाख लिटरचे दुधाचे नुकसान होत आहे. जनावरे दगावल्याने होणारे नुकसान लक्षात घेता त्यापोटी मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. सध्या देशातील दूध उत्पादन अकरा टक्के घट झाली आहे. जनावरांचा भाकडकाळ सुद्धा वाढलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी.
दरम्यान, कोल्हापुरात गोकुळ, वारणा दूध संघ तसेच पशुसंवर्धन विभागाने लम्पीग्रस्त (Lumpy Skin Disease) जनावरांचे 100 टक्के लसीकरण केले. राज्यातही लसीकरणाची ही मोहीम प्रभावीपणे राबवली गेली आणि ती देशात स्वीकारली गेली .पशुसंवर्धन विभाग आयुक्त आणि त्यांच्या विभागातील कर्मचारी यांचे यासाठी कौतुक आहे. आता या जनावरांना बूस्टर डोस द्यावा लागतो की काय? अशी स्थिती आहे, याबाबत शासनाने आपले धोरण स्पष्ट करणे गरजेचे आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मिळणारी भरपाई याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा असे पाटील यांनी सांगितले.
लम्पीबाधित जनावरांवर मोफत उपचार करा; सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी
दरम्यान, लम्पी या आजारामुळे देशातील शेतकऱ्यांना पशूधन वाचविण्यासाठी मोठा खर्च आला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचार व्हायला हवेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली आहे. लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक जनावरं दगावली आहे तर जवळपास 30 लाख जनावरांना लागण झाली आहे. या आजारामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशूधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करण्याची गरज असल्यातं त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या