Mahavitran : महावितरणने 'सुरक्षा ठेव' केली दुप्पट; हप्त्याने भरणा करण्यासाठी पर्याय माहीत आहे का?
Mahavitaran : सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी येत होती. मात्र, नवीन विनियमांनुसार एप्रिल 2022 पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे.
Kolhapur News : महावितरणने (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) चालू महिन्यात सुरक्षा डबल करतानाच सोबत बिल सुद्धा लागू केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना डबल शाॅक बसला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना एकरकमी रक्कम भरणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ग्राहकांना पर्याय सांगितला आहे. सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी येत होती. मात्र, नवीन विनियमांनुसार एप्रिल 2022 पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांनी रक्कम सहा हप्त्यांत भरावी. अथवा ते सुद्धा शक्य नसल्यास 20 किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांनी प्रीपेड मीटरची मागणी करावी, म्हणजे सुरक्षा ठेव भरावी लागणार नाही. तसेच दोन टक्के वीजदर सवलतही मिळेल, अशी माहिती प्रताप होगाडे यांनी दिली आहे. राज्यात उष्णतेची लाट आल्यापासून वीजेची मागणी सुद्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत नेहमीच्या अदा होणाऱ्या बिलापेक्षा एप्रिलचे वीज बील वाढून येणार आहे यात शंका नाही.
रक्कम 6 महिन्यांत 6 हप्त्यांमध्ये भरता येईल
ज्या ग्राहकांकडून सुरक्षा ठेव भरण्यात आलेली नाही, त्यांना चालू वर्षात पुन्हा बिले पाठविली गेली आहेत. सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा हप्त्यांची सवलत देण्यात आली आङे. मात्र, महावितरणने ग्राहकांवर एकरकमी संपूर्ण रकमेची मागणी बिले लागू केली आहेत. तथापि, त्या बिलांमध्ये रक्कम 6 महिन्यांत 6 हप्त्यांमध्ये भरता येईल, अशी माहिती इंग्रजी भाषेत दिली आहे. ग्राहकांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे आवाहन होगाडे यांनी केले आहे.
प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही
ज्या ग्राहकांसाठी रक्कम मोठी आहे व आर्थिक अडचणीमुळे रक्कम हप्त्याने भरणेही शक्य नाही, अशा ग्राहकांनी पत्राद्वारे प्रीपेड मीटर पर्यायासाठी अर्ज करावा. प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही. मात्र, 20 किलोवॉटचे आतील जोडभार असलेल्या ग्राहकांसाठीच ही सुविधा उपलब्ध आहे. प्रीपेड मीटरचा पर्याय स्वीकारला तर सध्याची जमा सुरक्षा अनामत रक्कम ग्राहकाच्या प्रीपेड खात्यामध्ये वर्ग केली जाईल व त्यामधून त्याच्या पुढील वीज वापराची रक्कम वजा करण्यात येईल. तसेच प्रीपेड मीटर ग्राहकांना वीज आकार व इंधन समायोजन आकार यामध्ये अतिरिक्त 2 टक्के वीज दर सवलत उपलब्ध आहे.
इतर महत्वाच्या बातम्या