Maharashtra Vs Karnataka: कन्नडिगांची पुन्हा दडपशाही, बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी
Maharashtra VS Karnataka border dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद पूर्वापार चालत आला आहे. बेळगावातील मराठी भाषिक महामेळाव्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता.
कोल्हापूर: बेळगावात पुन्हा एकदा कन्नडिगांच्या दडपशाहीचा प्रकार समोर आला आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेळगावमध्ये सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समिती हा महामेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कोल्हापुरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्या बेळगावकडे जाणार आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे या सगळ्यांना कर्नाटक पोलिसांकडून सीमेवरच अडवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कर्नाटक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यावर आता महाराष्ट्रातील नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागले. उद्याच्या बेळगाव्यातील या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेमके कोणते नेते उपस्थिती लावणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कर्नाटक सरकारचं म्हणणं काय?
महाराष्ट्र एकीकरण समिती 2006 पासून मराठी भाषिक मेळाव्याचे आयोजन करत आहे. मात्र, दरवर्षी कर्नाटक सरकारकडून या कार्यक्रमाच्या आयोजनात खोडा घातला जातो. यंदाही कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत स्थानिक प्रशासनाने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र, हे नेते मेळाव्याला उपस्थिती लावण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, कन्नडिगांच्या दडपशाहीबाबत मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमक्या याच काळात कर्नाटक सरकारने बेळगावात विधिमंडळ अधिवेशन भरवले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्थेचे कारण दिले जात आहे. मात्र, कोल्हापूरातील शिवसैनिकांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. आम्हाला बेळगावमध्ये प्रवेश मिळाला नाही तर आम्हीदेखील कर्नाटकमधील नेत्यांना कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाला येऊ देणार नाही, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे सोमवारी बेळगावात काय घडणार, हे पाहावे लागेल. शिवसैनिकांनी बेळगावमध्ये प्रवेश केल्यास त्यांची पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता आहे. अशावेळी या सगळ्याबाबत महाराष्ट्रातील नेते काही प्रतिक्रिया देणार, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा