(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime: पगार न दिल्याने दोघा कामगारांकडून मेंढपाळाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून
संशयित आरोपी संदीप आणि रविकिरण या दोघांचा पगार देण्यात आला नव्हता. शुक्रवारी मारुतीच्या बकऱ्यांचा कागल तालुक्यातील बानगेत तळ बसवण्यात आला होता.
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेंढपाळाच्या खुनाचा उलघडा झाला आहे. पगार न दिल्याने दोघा कामगारांनी कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना घडली. मारुती मायाप्पा धनगर (वय 28) असे मयत मेंढपाळाचे नाव आहे. कागल पोलिसांनी संदीप दादासो माळी (वय 36, रा. नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) आणि रविकिरण चैनया (रा. बेळगाव) यांना अटक केली आहे. कामाचा पगार न दिल्याने दोघांनी कुऱ्हाडीने घाव घालून खून केला.
मयत मारूतीचा शुक्रवारी निर्घृण खून झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार मारुतीकडे संशयित आरोपी संदीप आणि रविकिरण कामगार होते. मात्र या दोघांचा पगार देण्यात आला नव्हता. शुक्रवारी मारुतीच्या बकऱ्यांचा कागल तालुक्यातील बानगेत तळ बसवण्यात आला होता. या तळावर पगारावरून तिघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून मारुतीचा निर्घृण खून करण्यात आला. झोपेत असताना दोघांनी वार करून मृतदेह ऊसात टाकून दिला होता.
खून केल्यानंतर ते गावामध्येच लपून बसले होते. दोघेही दारुच्या नशेत होते. पोलिसांनी शोधमोहिम राबवत त्यांच्या मुसक्या आवळल्या. शनिवारी घरी न आल्याने मयत मारुतीचा कुटुंबीयांकडून शोध सुरु होता. कामगारांना विचारले असतान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. शनिवारी सायंकाळी सिद्धू धनगर यांना मारुतीचा मृतदेह आढळला.
विहिरीत कोसळून जीव गेलेल्या तरूणाच्या प्रकरणाला वेगळे वळण
दरम्यान, मध्यरात्री प्रेयसीने प्रियकराला भेटायला बोलावल्यानंतर सापडल्याने पळून जाताना विहिरीत कोसळून जीव गमावल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात घडली होती. शुभंकर संजय कांबळे (वय 17, रा. वाकीघोल, ता. राधानगरी, जि.कोल्हापूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलं आहे. मृत शुभंकरच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पाचर्डे (ता. भुदरगड) येथे झालेल्या शुभंकर कांबळे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांवर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शुभंकरचे वडील संजय कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभंकरला मैत्रिणीने भेटण्यासाठी फोन करून बोलावले होते. याच रागावरून शुभंकरच्या छातीवर व इतरत्र लाथाबुक्यांनी मारहाण करून झाडाला बांधून ठार मारल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाचर्डे येथील संजय साताप्पा कांबळे, एकनाथ दिनकर कांबळे, रंगराव लक्ष्मण कांबळे, आकाश ज्ञानदेव कांबळे, अक्षय अंकुश कांबळे, आदर्श रंगराव कांबळे, प्रवीण दत्तात्रय कांबळे व महेश शंकर कांबळे (रा. नाधवडे), अक्षय आनंदा कांबळे (रा. आडोली, ता. राधानगरी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या