Kolhapur Rain Update: राधानगरी धरण 50 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची आस
राधानगरी धरणात गेल्या तीन दिवसात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील केवळ लघु क्षमतेचे दोन प्रकल्प भरले असून उर्वरित धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे.
Kolhapur Rain Update: धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसाने राधानगरी धरणात गेल्या तीन दिवसात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे धरण 50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणापैकी केवळ लघु क्षमतेचे दोन प्रकल्प भरले असून उर्वरित धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे. कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप असली, तरी त्यामध्ये जोर नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव तसेच पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तळाला आहे. गेल्यावर्षी मोसमात जवळपास भरलेल्या कळंबा तलावात यंदा फक्त 20 टक्के पाणीसाठा आहे.
धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प
गेल्यावर्षीच्या तुलनेत एक जूनपासून जिल्ह्यातील प्रमुख 15 धरण परिसरात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळेच धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. वारणा धरण, आंबेओहोळ, जंगमहट्टी, चिकोत्रा या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत नगण्य पाऊस झाला आहे. वारणा धरण परिसरात गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये तब्बल 1059 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदा अवघ्या 346 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आंबेओहोळ प्रकल्प परिसरात अवघ्या 296 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर शहरातही पावसाचे प्रमाण कमी
कोल्हापूर शहरात गेल्यावर्षी 457 मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र अवघ्या 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यामधील तलावामध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्याचा अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहर आणि आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेतही पाऊस झालेला नाही. त्यामुळे केलेली पेरणी संकटात आली आहेच, पण पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीपाच्या पेरण्याही पूर्ण झालेल्या नाहीत. सर्वाधिक बिकट परिस्थिती शिरोळ तालुक्यात आहे.
काळम्मवाडी धरणता अवघा 20 टक्के पाणीसाठाक
कोल्हापूर शहरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी थेट पाईपलाईन योजना काळम्मावाडी धरणातून करण्यात आली आहे. यासाठी 53 किमीची लाईन टाकण्यात आली आहे. धरणाची पातळी 613 मीटरवर गेल्यानंतर थेट पाईपलाई योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये पाणी आल्याने महत्वाचा टप्पा पार पडला आहे. मात्र, धरणात आजघडीला केवळ 20 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा व्हावा, यासाठी कोल्हापूरकरांचे डोळे धरणाकडे लागले आहेत. धरणाची पाणीक्षमता 25.39 टीएमसी असून आता फक्त 4.80 टीएमसीच्या आसपास पाणीसाठा झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या