Kolhapur Rain update: तब्बल दीड महिन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुखाच्या सरी कोसळल्याने उभ्या पिकांना जीवदान
हाता तोंडाला आलेल्या भात, भुईमूग, सोयाबीन पीकांनी ऑगस्ट महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने मान टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिके काहीअंशी वाचली गेली आहेत.
कोल्हापूर : जवळपास गेल्या दीड महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पूर्णतः पावसाने दडी मारल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सुखाच्या सरींनी हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसाने खरीप पिकांना अक्षरशः जीवदान मिळाले आहे. हाता तोंडाला आलेल्या भात, भुईमूग, सोयाबीन पीकांनी ऑगस्ट महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने मान टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिके काहीअंशी वाचली गेली आहेत.
ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णत: दडी मारल्याने खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित होऊ शकली नाही. माळरानावरील भात, भुईमूग, सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला फटका बसला आहे. गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर हीट प्रमाणेच वातावरण होते. उन्हाची तीव्रता मोठ्या जाणवत होती, मात्र पाऊस काही कोसळत नव्हता. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण ढगाळ होते. गेल्या दोन दिवसांपासून मात्र सरी कोसळल्या.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी तालुक्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, उर्वरित ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा कधी नव्हे ती पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे एकंदरीत अपेक्षित पाऊस अजूनही झालेला नाही. पावसाचे आगार मानले जाणाऱ्या शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांमध्य पाऊस झाला असला, तरी शिरोळ करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पीके एकंदरीत संकटात आहेत. पावसाने ओढ दिल्याने पिकांना पंपाद्वारे पाणी दिले जात आहे. पिके पोटरीत असताना पाऊस न झाल्याने बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली आहे.
पावसाने ओढ दिल्यास शेतीसाठी धरणातून पाणी सोडा
दरम्यान, पावसाने ओढ दिल्यास खरीपाच्या पिकांना धोका पोहोचू नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा व अन्य धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी या धरण प्रकल्पांच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात घेण्यात आली. खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे उभ्या पिकांसाठी पाण्याची मागणी होत आहे. बैठकीत वारणा, राधानगरी, तुळशी धरणांच्या पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले. या तीन धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :