Ajit Pawar Rally in Kolhapur : शरद पवारांनी सभा घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांची उद्या कोल्हापुरात उत्तर सभा; तपोवन मैदानावर जय्यत तयारी
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तपोवन मैदानात सभा होत आहे. या सभेसाठी कमानी, आणि कटआऊट्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. सभेसाठी मोठी गर्दी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 दिवसांपूर्वी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात जंगी सभा घेतली होती. यानंतर आता अजित पवार गटाकडूनही कोल्हापुरात सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तपोवन मैदानात सभा होत आहे. या सभेसाठी कमानी, आणि कटआऊट्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. सभेसाठी मोठी गर्दी होणार असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. उत्तर नव्हे, तर उत्तरदायित्व सभा असल्याचा दावा अजित पवार गटाककडून करण्यात येत आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापुरातून ईडीच्या रडारवर असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनीही त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटीलसुद्धा अजित पवार गटात आहेत. चंदगडचे आमदार राजेश पाटील अजित पवार गटात आहेत. त्यामुळे उद्याची सभा जोरदार होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
सभेला कोण कोण उपस्थित राहणार?
उद्या तपोवन मैदानात होणाऱ्या सभेसाठी जिल्ह्यातील नेत्यांसह अजित पवार गटातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्या रविवारी दुपारी साडे तीन वाजता कोल्हापूर शहरातील कावळा नाक्यावर आगमन झाल्यानंतर तेथून मिरवणुकीने तपोवन मैदानात आणले जाणार आहे. मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी तपोवन मैदानावर पाहणी केली. मैदानात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग मैदानाच्या पश्चिम बाजूला असेल.
'ईडी' कारवाईतून स्वत:सह बँकेलाही वाचवल्याबद्दल अभिनंदन
दुसरीकडे, हसन मुश्रीफ ईडीच्या रडावर आल्यानंतर तीनवेळा छापेमारी करण्यात आली होती. जिल्हा बँकेतही छापेमारी करण्यात आली होती. यावरून कोल्हापुरात झालेल्या सभेत हसन मुश्रीफ यांना खोचक शब्दात टोला लगावला होता. दरम्यान, शुक्रवारी काँग्रेस नेते प्रा. किसन कुराडे यांनीही जिल्हा बँकेत बोलताना वर्षभरात स्वत:सह बँकेलाही वाचवले अशा खोचक शब्दात मुश्रीफांना टोला लगावला. कुराडे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या मागील सभेत कारवाईबद्दल 'ईडी'च्या निषेधाचा ठराव आपण मांडला. पण, वर्षभरात स्वत:सह बँकेलाही वाचवल्याबद्दल 'शहाणे आणि वेड्यांचे' अभिनंदनाचा ठराव मांडतो. कुराडे बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर तुमचे वय 81 झाले, आपला सहस्रचंद्र सोहळा साजरा करु, असे डिवचल्यानंतर तुम्ही 81 वर्षांचा उल्लेख केला म्हणजे, बँकेची पुढची सभा पहतो की नाही, याची भीती वाटते, असे कुराडे म्हणाले. बँक साखर उद्योगाकडे सख्या तर वस्त्रोद्योगाकडे सावत्र भाऊ म्हणून पाहते, असा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या :