Kolhapur Rain : नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली, कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर (Narsinhwadi Datta temple) पुराच्या पाण्याखाली गेलं आहे.
Kolhapur Rain : सध्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर (Narsinhwadi Datta temple) पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. या संपूर्ण मंदिला पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे.
श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर हे कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर वसले आहे. हे मंदिर आता पुराच्या पाण्याखाली गेले आहे. श्री दत्त मंदिराचा कळस वगळता पूर्ण मंदिर पाण्याखाली बुडालं आहे. सध्या कोयना आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हा पाण्याचा विसर्ग पाहता कळसही लवकरच पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. दर्शन मूर्ती मंदिर परिसरातील वरील भागात आणून पूजा अर्चा सुरु आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूटांवर
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यात भूस्खलन घडल्याची घटना घडली. त्यानंतर प्रशासनाकडून रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. यामुळं कोल्हापूर येथील शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण परिसरात भुस्खलन झाले होते.
आज सकाळी 10 वाजता राधानगरी धरणाचे तीन नंबरचे स्वयंचलित दार बंद झालं आहे. धरणाचे एकूण 4 दरवाजे (4,5,6,7) उघडे आहेत. या चार दरवाज्यातून 5 हजार 712 क्युसेक विसर्ग सुरु आहे, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग होत आहे. धरणातून एकूण विसर्ग 7 हजार 312 क्युसेक्सने सुरू आहे. आजपासून तुळशी धरण पूर्ण भरल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवून 1700 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना तुळशी धरण प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: