'शिवद्रोही' प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांचा कळंबा जेलमधून 'राजेशाही थाटात' निरोप; माध्यमांच्या सुद्धा गाड्या अडवल्या, बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंगच्या कारचा वापर
प्रशांत कोरटकरच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलिसांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. आजही प्रशांत कोरटकरची सुटका होणार असल्याने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Prashant Koratkar : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गरळ ओकून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार होऊन पोलिसांना सापडला.प्रशांत कोरटकरला पहिल्यांदा पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. प्रशांत कोरटकर कळंबा जेलमधून सुटताच कोल्हापुरातून व्हाया मुंबई नागपूरला रवाना झाला. मात्र, प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांनी दिलेली स्पेशल ट्रीटमेंट चर्चेची विषय ठरला आहे.
प्रशांत कोरटकरला राजेशाही थाटात निरोप
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यांमुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोल्हापूरमध्ये त्याला न्यायालयात हजर करताना कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रशांत कोरटकरच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलिसांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. आजही प्रशांत कोरटकरची सुटका होणार असल्याने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, हे करत असताना कोल्हापूर पोलिसांनी एक प्रकारे राजेशाही थाटामध्येच त्याला निरोप दिल्याचे दिसून आले. एका आरोपीसाठी माध्यमांच्या गाड्याही अडवण्याचे महान कार्य कोल्हापूर पोलिसांनी करून दाखवले.
कोरटकरची सुटका करण्यासाठी काळ्या फिल्मिंग असलेल्या कारचा वापर
सर्वसामान्यांच्या कार फिल्मिंग सापडल्यास जागेवर पावती फाडून कारवाई केली जाते. मात्र, आज कोल्हापुरात राज्याच्या नव्हे, तर देशाच्या आराध्य दैवतावर गरळ ओकणाऱ्या कोरटकरची सुटका करण्यासाठी काळ्या फिल्मिंग असलेल्या कारचा वापर करण्यात आला. कोरटकरला सोडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून MH-08-AN-6776 या फिल्मींग कारचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकाराविरोधात कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी या संदर्भातील नाराजी मेलने व्यक्त करत संबंधित कारचा फोटोही निर्दशनास आणून दिला आहे.
त्या एरियामध्ये या वाहनास कोणी परवानगी दिली?
दिलीप देसाई आणि आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, चार चाकी वाहनांच्या काचाना फिल्मिंग करणे किंवा काळ्या रंगाच्या काचा वापरणे यास कायद्याने प्रतिबंध आहे. हे माहित असतानाही अशा वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाला आहेत. तथापि अनेक वाहने अशा प्रकारे काळ्या काचा लावून राजरोसपणे फिरत आहेत. आजच आरोपी प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून जामीनावर सुटका झाली. यावेळी काळ्या काचा असणारी चार चाकी कळंबा कारागृहामध्ये दिसली आणि त्याच कारमधून आरोपी निघून गेला. ज्या भागांमध्ये बाहेरच्या व्यक्ती, नागरिकांना वाहन नेता येत नाही त्या एरियामध्ये या वाहनास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. या वाहनाने मोटर वाहन कायद्याच्या तरतुदींचे पालन केले आहे किंवा नाही याची शहानिशा न करता कोणाच्या सांगण्यावरून सदर वाहन ते बाहेर सोडण्यात आले, या बाबींची चौकशी जिल्हा पोलीस प्रमुख त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करणे अगत्याचे आहे. पोलीस अधिकाऱ्यांसमोर कायद्याची पायमल्ली करणारे वाहन असून सुद्धा पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही, याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























