(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: एकमेकांना 24 तास पाण्यात बघणारे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे 'पाण्यासाठी' एक झाले! चर्चा तर होणारच
Hasan Mushrif and Samarjeet Ghatge: एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या कागल तालुक्याच्या राजकारण्यांची पाण्यासाठी झालेली एकी पाहून जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आणि राजकीय भूवया सुद्धा उंचावल्या.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील आणि गटातटाचे राजकारण केले आणि त्याची दखलही राज्य पातळीवर घेतली जाते असा तालुका म्हणजे कागल. कागल तालुका म्हणजे एकप्रकारे कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. घनघोर राजकीय संघर्ष या तालुक्याने गेल्या अनेक दशकांपासून पाहिला आहे आणि तो आजही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये सुरु आहे.
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये जिल्हा बँकेच्या राजकारणावरून घनघोर संघर्ष झाला होता. त्याच पद्धतीने आता मुश्रीफ आणि घाटगे गटात सुरु आहे. कागल तालुक्याचे राजकारण या दोन गटामध्ये सर्वाधिक विभागले गेले आहे. याच तालुक्यात थोडं वेगळं चित्र शनिवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. निमित्त होते इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेतून पाणी देण्यास होणारा विरोध. इचलकरंजी दुधगंगा नदीतून पाणी देण्यास कागलमधील सर्वच नेत्यांनी मतभेद बाजूला एकमुखाने कडाडून विरोध केला. एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या कागल तालुक्याच्या राजकारण्यांची पाण्यासाठी झालेली एकी पाहून जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आणि राजकीय भुवया सुद्धा उंचावल्या.
इचलकरंजी विरुद्ध कागल संघर्ष
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फुटीर अजित पवार गटातून मंत्री झालेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासह कागल तालुक्यातील नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय या योजनेच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील केली. इचलकंजीकरांनी पाण्यासाठी आपल्याकडे येऊच नये, अशीच भूमिका वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ यांनी मांडली. सुळकूड पाणी योजनेला मान्यता देण्यात आल्यानंतर इचलकंजी विरुद्ध कागल संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
बैठकीनंतर बाहेर पडल्यानंतर काही काळ हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकमेकांच्या जवळ येत काही क्षण विनोदात रमल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. अतिशय शेलक्या शब्दांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये टीकेचा स्तर खाली गेला आहे.
हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर
हसन मुश्रीफ अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरुन ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर तीनवेळा ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून गॅसवर असलेल्या मुश्रीफ यांनी अजित पवार गटामध्ये कलटी मारल्यानंतर सगळं ग्वाड वाटू लागलं आहे. ईडीग्रस्त असलेल्या मुश्रीफ थेट मंत्री झाल्याने ईडीकडून होणाऱ्या विरोधाची सुद्धा धार कमी होऊन गेली आहे. याची प्रचिती न्यायालयात सुद्धा येऊन गेली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांची कळी चांगलीच खुलली आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागण्यात घाटगेंचा हात असल्याचा दावा मुश्रीफांनी सातत्याने केला आहे. घाटगे यांनीही सातत्याने टीकेचे बाण सोडले आहेत.
दुसरीकडे, मुश्रीफ सत्तेत आणि मांडीला मांडी लावून आल्याने पराभूत झाल्यापासून मतदारसंघात फिरत असलेल्या समरजितसिंह घाटगे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर समरजित घाटगे थेट भूमिगत झाल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, दोन दिवसांनी मेळावा घेत त्यांनी भाजपसोबत असल्याचे जाहीर केले. मुश्रीफ यांनी बंडाळी केल्यानंतर कागल तालुक्यासह जिल्ह्यात बॅनरबाजी झाली. या बॅनरबाजीमधून मुश्रीफ यांना डिवचण्याचा उद्योग झाला होता.
हे सगळं रामायण सुरु असताना सुळकूड पाणी योजनेवरुन उभय नेत्यांनी राजकीय आणि पक्षीय मतभेद विसरुन एक व्हावे लागले. दोघांची कुस्ती कागल मतदारसंघासाठी असल्याने आणि हा मुद्दाही मतदारसंघाशी निगडीत असल्याने दोघांनाही एकाच व्यासपीठावर यावे लागले. दोघांनी सुद्धा थेट भूमिका इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध केला. कागलमध्ये पाण्यासाठी सगळे गट एकत्र आल्याने इचलकरंजीमधील नेतेही एक होणार का? याकडे आता राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशीच मागणी कागलमधून झालेल्या विरोधानंतर होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या