Kolhapur News : कोल्हापुरात राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांना 24 तास खडा पहारा देण्याची वेळ!
Kolhapur News : राजापूर बंधाऱ्यावर दोन पोलीस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असे चार जणांचे पथक दोन पाळींमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे. 24 तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) शिरोळ (Shirol) तालुक्यात कृष्णा नदीवर (Krishna River) शेवटचा कोल्हापुरी बंधारा असणाऱ्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्यासाठी चक्क पोलिस बंदोबस्त नेमण्याची वेळ आली आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये भीषण पाणीटंचाई असल्याने आठ दिवसांपूर्वी अज्ञातांकडून राजापूर बंधाऱ्यावरील बरगे काढण्यात आले होते. त्यामुळे कर्नाटक राज्याकडे पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. कोल्हापुरात कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने पाण्याचा सुरक्षासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. राजापूर बंधाऱ्यावर दोन पोलीस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असे चार जणांचे पथक दोन पाळींमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा अज्ञातांकडून बरगे काढण्याची शक्यता असल्याने 24 तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजापूर बंधारा कोल्हापुरातील शेवटचा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा
सांगली पाटबंधारे शाखा नृसिंहवाडी कार्यालयाचे शाखा अभियंता रोहित दानोळी यांनी राजापूर बंधाऱ्यावर बंदोबस्त लावण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली होती. यानंतर दोन पोलिस आणि पाटबंधारे विभागातील दोन कर्मचारी असं पथक पाण्याच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलं आहे. राजापूर बंधारा हा कोल्हापुरातील शेवटचा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. त्यामुळे सर्व बरगे लावून 40 फुटांवर पाणी अडवण्यात आलं आहे. पाण्याचा एक थेंबही विसर्ग कर्नाटकच्या दिशेने होत नाही. मात्र बंधाऱ्या पलीकडील बाजूस पाणी पातळी खालावली आहे. कर्नाटक राज्यामध्ये सध्या पाणीटंचाई असल्याने आठ दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री बंधाऱ्याचे बरगे काढले होते.
कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली
त्यामुळे बेकायदेशीर पद्धतीने कर्नाटकच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू होता. या संदर्भाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी चांगलीच खालावली होती. त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, असा कोणताही आदेश नव्हता, हा अज्ञातांकडून करण्यात आलेला प्रकार होता. त्यामुळे आता 24 तास जास्त घालण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या