(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अफजलखानाचा कोथळा काढलेली शिवरायांची वाघनखे 'या' तारखेपासून कोल्हापूर, साताऱ्यात 'याची देही याची डोळा' पाहता येणार!
वाघनखे मुंबईत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना होणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत वाघनखे घेऊन येण्यासाठी करार करण्यात येणार आहे.
कोल्हापूर/सातारा : महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठची अफलातून कृती करताना वाघनख्यांनी (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe) अफलजखानाचा कोथळा बाहेर काढला होता. असा देदीप्यमान आणि गौरवशाली वारसा असणारी छत्रपती शिवरायांची वाघनखे मुंबई आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत आणण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरून परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वाघनखे मुंबईत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (1 ऑक्टोबर) लंडनला रवाना होणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत वाघनखे घेऊन येण्यासाठी 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
असा असेल वाघनखांचा प्रवास
- 16 नोव्हेंबरला वाघनखांचे मुंबईत आगमन
- 17 नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना
- 17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील
- 15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.
- एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.
- नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 दरम्यान वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील.
- 16 नोव्हेंबर 2026 रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही (Jagdamba Sword) सध्या ब्रिटनमध्ये आहे. ती परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे.
इतर महत्वाच्या बातम्या