Kolhapur News: स्पीडब्रेकरवर घात झाला अन् आईच्या डोळ्यादेखत पोटची चिमुकली लेक बसखाली चिरडली
शहरातील सानेगुरुजी वसाहतीमध्ये प्रतिराज बंगल्यासमोर केएमटी बस स्टॉप आहे. याच ठिकाणी हा अपघात घडला. आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याने हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या पोटामध्येच गोळा आला.
Kolhapur News : कोल्हापुरात (Kolhapur) मनाला येईल त्या पद्धतीने केलेल्या स्पीडब्रेकरने चिमुकलीचा हकनाक बळी गेला आहे. संस्कृती नेत्रदीप खरात (वय 4) असे त्या निष्पाप दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. शहरातील सानेगुरुजी वसाहतीमध्ये प्रतिराज बंगल्यासमोर केएमटी बस स्टॉप आहे. याच ठिकाणी हा अपघात घडला. आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याने हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या पोटामध्येच गोळा आला. अरुंद रस्त्यावर बसचालकाने अचानक बस उजव्या बाजूला घेतल्याने दुचाकीला धक्का लागल्यानंतर चिमुरडी संस्कृती खाली कोसळून बसच्या मागील चाकाखाली सापडली.
याच स्टॉपवर प्रवासी घेण्यासाठी केएमटी बस (एमएच-09-सीडब्लू-0355) उभी होती. बसने प्रवासी घेतल्यानंतर पुढे जात असतानाच संस्कृतीची आई नेहा खरात त्यांची दुचाकी (एमएच-09-डीएच-0243) वरून ओव्हरटेक करून पुढे जात असतानाच स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही. यामध्येच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचे हँडल बसला घासले. त्यामुळे तोल जाऊन नेहा उजव्या बाजूला फेकल्या गेल्या. यावेळी मागे बसलेली चिमुरडी मुलगी संस्कृती रस्त्यावर कोसळली.यावेळी प्रवासी घेतल्याने बसने वेग घेतल्याने संस्कृती बसच्या मागील चाकात चिरडली.
याठिकाणी असलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या संस्कृतीला तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. परंतु त्यांनी ‘सीपीआर’मध्ये नेण्यास सांगितले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी बसचालक दीपक शिवाजी सुर्यवंशी (रा. हेरले, ता. हातकणंगले) गुन्हा दाखल केला असून अपघातानंतर त्याने पळ काढला होता.
दररोज जीव मुठीत घेऊनच प्रवास
नेहा व रत्नदीप खरात कोल्हापुरात लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर परिसरात राहतात. नेहा जीवबाबा नाना जाधव पार्कमध्ये माहेरी बाळंतपणासाठी आल्या होत्या. त्यांना संस्कृती पहिली मुलगी होती. आठ महिन्यांचा धाकटा मुलगा आहे. नेहा माहेरमधून मुलगी संस्कृतीला रोज शाळेला ने आण करत होत्या. ज्याठिकाणी अपघात ते त्याठिकाणी कोणतीही निशाणी नसलेल्या स्पीडब्रेकर आहेच, पण अरुंद रस्ता सुद्धा आहे. त्याच ठिकाणी बस थांबा असल्याने अपघाताला निमंत्रण मिळाले. अपघातानंतर तो बस थांबा हटवण्यात आला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कोल्हापुरात अपवाद सोडल्यास एकाही स्पीडब्रेकर पट्टे नाहीत. त्यामुळे कोल्हापूरकरांचा दररोज जीव मुठीत घेऊनच प्रवास सुरु असतो.
इतर महत्वाच्या बातम्या